विशेष प्रतिनिधी, पुणे
प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिस २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल ३५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या भरतीमध्ये फ्रेशर्सला संधी देण्यात येणार आहे. तसेच जुलैपासून वेतनवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहिती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी दिली आहे.
त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध करताना कंपनीच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची माहिती या वेळी देण्यात आली. डिजिटल क्षेत्रात पारंगत उमेदवारांची मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर कंपनीतर्फे ३५ हजार पदवीधारक उमेदवारांना नियुक्त करण्यात येईल. कंपनीचा डिजिटल महसूल एकूण महसुलाच्या ५३.९ टक्के होता, असे श्री. राव यांनी सांगितले.
इन्फोसिसने एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीत ५,१९५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मागील तिमाहीत कंपनीला ५,०८० कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीने २०२२ या आर्थिक वर्षासाठी १४ ते १६ टक्के महसूल गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इन्फोसिसच्या अहवालानुसार, कंपनीचे उत्पन्न जूनच्या तिमाहीत २६,३१० कोटींवरून २७,९०० कोटी रुपये वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला २६० कोटी डॉलर्सच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. वित्तीय सेवांमधून कंपनीचे उत्पन्न ९,२२० कोटी रुपये होते. तसेच उत्पादन क्षेत्राकडून कंपनीला २७० कोटी रुपये मिळाले आहेत.
कर्मचारी आणि ग्राहकांच्या सहकार्याने कंपनीती तिमाहीत गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक वाढ होती. वार्षिक आधारावर ही वाढ १६.९ टक्के आणि तिमाहीच्या आधारावर ४.८ टक्के नोंदविण्यात आली. त्यामुळे महसुली विकास दर १४ ते १६ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती इन्फोसिसचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी दिली.