पुणे – शासकीय कार्यालय असो की खासगी कंपनी प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळते. विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये ही साप्ताहिक सुट्टी रविवारी असते. तर काही खाजगी कंपन्यांमध्ये शनिवारी सुट्टी दिली जाते. काही शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानुसार शनिवारी व रविवारी अशी दोन दिवस साप्ताहिक सुट्टी दिली होती, परंतु आता एका आयटी कंपनीने आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
वास्तविक अनेक ठिकाणी कोरोनाच्या संसर्गामुळे ‘वर्क फॉर्म होम’ अशा पध्दतीने काम सुरू होते, मात्र आता हळूहळू अनेक ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्यक्षपणे कार्यालयांमधून कामकाज सुरू झाले आहे. त्याच वेळी टीएसी या सायबर सिक्युरिटी कंपनीने मुंबई कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवड्याची सुट्टी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ ४ दिवस काम करावे लागेल. तथापि, कंपनी अजूनही एक प्रयोग म्हणून त्याकडे पाहत आहे. त्यानंतर पुढे ७ महिन्यांच्या काळात दर आठवड्यात ३ दिवस सुट्टी मिळाल्यानंतरही कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढली तर हा नियम कायमचा लागू होईल.
या निर्णयाचे स्पष्टीकरण करताना कंपनीने म्हटले आहे की, नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीचे काम आणि वैयक्तिक जीवनामध्ये चांगले संतुलन राखण्यास मदत होईल. तसेच ते कामावर परततील तेव्हा अधिक उत्साहाने येतील. कंपनीच्या २०० कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे वर्णन ‘फ्यूचर ऑफ वर्क’ असे केले आहे.
कंपनीच्या स्वतःच्या अंतर्गत सर्वेक्षणात, ८० टक्के कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ४ दिवस जास्त तास काम करण्याचे सांगितले. यामुळे त्यांना दीर्घ साप्ताहिक सुट्टी दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेण्याची अनुमती मिळेल. या घोषणेनंतर, कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा म्हणतात की, आमची कंपनी टीम तरूण आणि उत्साही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण कोणतेही प्रयोग करून वर्क लाईफ बॅलन्स तयार करण्यासाठी काही नवीन प्रयोग करू शकतो. सर्वांना ५ दिवस काम करण्याची सवय आहे. म्हणूनच आम्ही ते एक आव्हान मानतो. परंतु या नवीन प्रयोगाशी जुळवून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल.