मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरेगाव-भीमा प्रकरणात अनेकांची चौकशी करून त्यांची साक्ष आतापर्यंत नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणातील राजकीय व प्रशासकीय धागेदोरे अनेक बड्या नेत्यांपर्यंत व अधिकाऱ्यांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे चौकशीची मालिका सुरूच आहे. त्यात आता विश्वास नांगरे पाटील यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी करून साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणात नेमकं काय घडलं यासाठी ही चौकशी होणार असून २१ ते २५ जानेवारी या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी विश्वासन नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार या तिघांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या तिघांची चौकशी होण्यामागेही कारण आहे. कारण तिघेही या घटनेचे साक्षीदार आहेत. स्वतः विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक होते. तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक होते. आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे तपास अधिकारी होते. त्यामुळे त्या दिवशी नेमकं काय घडलं, याबद्दल तिघांचीही साक्ष नोंदविली जाणार आहे. प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार आणि तीन अधिकारी या साऱ्यांच्या चौकशीसाठी २१ ते २५ जानेवारी या कालावधीत वेळ निश्चित करण्यात आला आहे.
आयोगाची नोटीस
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने आरोपी हर्षाली पोतदार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, डॉ. शिवाजी पवार आणि सुवेझ हक यांना नोटीस बजावून चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी २१ ते २३ जानेवारी तर विश्वास नांगरे पाटील व सुवेझ हक यांची चौकशी २४ व २५ जानेवारीला होणार आहे.
राज्यभर पडसाद
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. १ जानेवारी २०१८ ला घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक झाली होती आणि त्यात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या घटनेचे पडसाद त्यानंतर राज्यभर उमटले होते.
IPS Vishwas Nangre Patil Police Officers Enquiry
Koregaon Bhima Case