मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएल २०२३ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सने पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता रविवारी विजेतेपदाच्या लढतीत गुजरातचा सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. मुंबईच्या पराभवानंतर या संघाला खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर लोक मीम्स शेअर करत आहेत. शुभमन, सारा आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी संबंधित मिम्सही खूप व्हायरल होत आहेत.
वास्तविक, गुजरातच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला, त्यानंतरच मुंबई इंडियन्सला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आले. बंगळुरू संघाने तो सामना जिंकला असता, तर मुंबई बाहेर पडली असती. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही शुभमनने शतक झळकावून विराट कोहलीचे शतक व्यर्थ ठरविले. आता चाहते मुंबईला ट्रोल करत आहेत की आधी प्लेऑफमध्ये पोहोचलो आणि नंतर बाहेर काढले.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या सत्रात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गतविजेत्या गुजरातने पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हार्दिकच्या संघाने गेल्या वेळी राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यावेळी अंतिम फेरीत त्याच्यासमोर चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज असेल.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ३ बाद २३३ धावा केल्या. ऋद्धिमान साहा १८ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने साई सुदर्शनसोबत १३८ धावांची भागीदारी केली. शुभमन ६० चेंडूत सात चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १२९ धावा करून बाद झाला. साई सुदर्शन ३१ चेंडूत ४३ धावा करून परतला. कर्णधार हार्दिक पंड्याने १३ चेंडूत २८ आणि राशिद खानने पाच धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८.२ षटकांत १७१ धावा करून सर्वबाद झाला. रोहित शर्मा आठ धावा, नेहल वढेरा चार धावा, कॅमेरून ग्रीन ३० धावा, विष्णू विनोद पाच धावा, टीम डेव्हिड दोन धावा, ख्रिस जॉर्डन दोन धावा, पियुष चावला खाते न उघडता तर कुमार कार्तिकेय सहा धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या तर तिलक वर्मा १४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला. गुजरातकडून मोहित शर्माने पाच विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.