मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रणजी असो, एकदिवसीय सामना असो आणि कसोटी असो एकदा एखाद्या खेळाडूला पंधरा खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले की, त्याच्या खात्यात पैसे जमा होतातच. मग तो खेळाडू मैदानात उतरला नाही किंवा एकही सामना खेळला नाही तरीही त्याला पैसे मिळतातच. पण याहीपेक्षा आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता होणारी कमाई मोठी असते.
रणजी, वन-डे किंवा कसोटीमध्ये अंतिम अकरामध्ये निवड झाली नाही तर विशिष्ट्य रक्कम कापून पैसे मिळतात. पण ती रक्कमही ५० टक्क्यांपेक्षा जास्तच असते. त्यातही खेळाडू करारप्राप्त असतील तर ते पगारावरच असतात. पण आयपीएल हे कुबेराच्या खजिन्याप्रमाणे आहे.
इथे तुमची अंतिम अकरामध्ये निवड झाली तर सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून त्याच दिवशी रोख रक्कम कमवा. शिवाय तुम्हाला फ्रेंचायजीकडून करारानुसार मिळणारी रक्कम वेगळीच असते. आणि समजा अंतिम अकरामध्ये निवड झाली नाही तर बाकावर बसून टाळ्या वाजवा आणि टीमचे प्रोत्साहन वाढवा. त्याचेही पैसे मिळतील. कारण फ्रेंचायजीने जेवढ्या पैशांमध्ये खेळाडूला खरेदी केले असते ती रक्कम त्याला मिळणारच असते. मग तो सामना खेळला की नाही याच्याशी काहीही घेणे-देणे नसते.
आयपीएल नावाच्या तिजोरीतून यंदा तीन खेळाडूंनी मस्त कमाई केली आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांमधील खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांनाही करारानुसार संपूर्ण पैसे मिळाले किंवा मिळणार आहेत. पण यंदाच्या सिझनमध्ये तिघेही एकही सामना खेळलेले नाहीत.
हे तिघे मालामाल
कुठल्याही खेळाडूसाठी पैसे महत्त्वाचे असतातच पण मैदानावर उतरून संघासाठी खेळणे जास्त महत्त्वाचे असते. पण दिल्ली संघात असलेला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लुन्गी एनगिडी, आरसीबीमध्ये असलेला न्युझीलंडचा सलामीवीर फिन एलन आणि राजस्थानमध्ये असलेला दक्षिण आफ्रिकेचा एक वेगवान गोलंदाज यांचा समावेश आहे.
लाखोंमध्ये कमाई
गुन्गी एनगिडीसोबत दिल्लीने ५० लाख रुपयांत करार केला होता. १४ पैकी एकही सामना तो खेळला नाही, पण पैसे पूर्ण मिळणार. फिन एलनसोबत आरसीबीने ८० लाखांत करार केला होता. त्यालाही १४ पैकी एकही सामना खेळवण्यात आला नाही. तर राजस्थानच्या त्या गोलंदाजाला सुद्धा एकही सामना न खेळता ५० लाख रुपये मिळणार आहेत.
IPL Cricket Players Franchisee Lakh Rupees