मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी दोन-तीन असे खेळाडू आयपीएलमधून गवसतात ज्यांची पुढे वर्षभर चर्चा असते आणि भारतीय संघातील एन्ट्रीचा मार्गही मोकळा होतो. तशीच कमाल सध्या राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने केली आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने चक्क १३ बॉल्समध्ये अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वांत वेगवान अर्धशतक नोंदविण्याचा विक्रम के.एल. राहुल याच्या नावावर होता. मात्र आता यशस्वी जयस्वाल याने तो आपल्या नावावर केला आहे. यशस्वीच्या रुपाने भारताला एक अव्वल हार्ड हिटर गवसला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यशस्वीने गुरुवारी केकेआरविरुद्ध १३ चेंडूंमध्ये अर्धशतक नोंदवले. केकेआरच्या १५० धावांचा सामना करण्यासाठी राजस्थान मैदानात उतरले तेव्हा पहिल्याच षटकात यशस्वीने २६ धावा खेचल्या. त्यात त्याच्या तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
https://twitter.com/IPL/status/1656698717607723009?s=20
केकेआरचा कर्णधार नितीश राणा याने गुरुवारी पहिलाच ओव्हर टाकला. त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्याने एकदाही गोलंदाजी केली नाही. कारण त्याच्या एकाच षटकात २६ धावा खेचून यशस्वीने सुरुवातीलाच इशारा दिला. यशस्वी जयस्वालने केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुर्दैवाने त्याचे शतक पूर्ण होण्यासाठी अवघ्या दोन धावांची गरज असताना राजस्थानने सामना जिंकला होता. त्यामुळे तो ९८ धावांवर नाबाद राहिला. यशस्वीने १२ चौकार आणि ५ षटकार खेचले. म्हणजे त्याने ९८ पैकी ७८ धावा बाऊंड्रीवर चेंडू पाठवूनच केल्या.
https://twitter.com/IPL/status/1656712424404455424?s=20
विराट कोहलीने केले कौतुक
भारतीय क्रिकेट संघाचा व बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने इन्स्टाग्रामवर यशस्वी जयस्वालचे कौतुक केले आहे. ‘ही आतापर्यंत बघितलेल्या उत्कृष्ट फलंदाजीपैकी एक आहे’ असे लिहीत विराटने अफलातून टॅलेंट असल्याची शाबासकीही यशस्वी जयस्वालला दिली आहे.
राहुलला टाकले मागे
आयपीएलच्या इतिहासात के.एल. राहुलच्या नावावर सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविल्याचा विक्रम आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्लीच्या संघाविरुद्ध अवघ्या १४ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या होत्या. १३ धावांमध्ये अर्धशतक नोंदवत यशस्वीने त्याला मागे टाकले आहे. राहुलनंतर पॅट कमिन्स, युसुफ पठाण, निकोलस पुरन यांचा नंबर लागतो.
https://twitter.com/IPL/status/1656899790826000385?s=20
IPL 2023 Yashaswi Jaiswal Fastest Fifty History Record