मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वात अग्रक्रमावर असलेल्या इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएलने प्रेक्षकांना थरारक सामन्यांची मेजवानी दिली आहे. प्रत्येक सामना उत्साह, जल्लोषाची पेरणी करणारा ठरत आहे. अशात स्पर्धेत सहभागी झालेल्यस दहा संघांपैकी दोन बाद झाले असून आठ संघ शिल्लक आहे. या आठमध्ये चषक जिंकण्यासाठी स्पर्धा सुरू असून आयपीएलचा हा टप्पा अधिक थरार निर्माण करणार आहे.
दिल्लीने एकूण १२ सामन्यात आठ पराभव पाहिले असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पंजाब किंग्सने त्यांना पराभूत करून प्ले ऑफच्या शर्यतीतून एक स्पर्धक बाहेर फेकला आहे. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून त्यांनाही प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाद केले आहे. पंजाब किंग्सने आजच्या विजयासह खात्यातील गुणसंख्या १२ केली व सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान रॉयल्सच्या खात्यातही १२ गुण आहेत. गुजरात टायटन्स ( १६), चेन्नई सुपर किंग्स ( १५), मुंबई इंडियन्स ( १४) व लखनौ सुपर जायंट्स ( १३) हे आघाडीवर आहेत.
दहा संघांचा समावेश असलेल्या लीगमध्ये १६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण कमावणारा संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरेल हे निश्चित आहे. गुजरात टायटन्सने त्यांची जागा पक्की केली आहे. परंतु, त्यांना टॉपला राहून क्वालिफायर १ मध्ये जागा निश्चित करायची आहे. त्यांचे आणखी दोन सामने ( वि. एसआरएच आणि वि. आरसीबी) शिल्लक आहेत आणि त्यापैकी एक विजय पुरेसा आहे. चेन्नई सुपर किंग्स १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांचेही दोन सामने (वि. केकेआर आणि वि. डीसी) आहेत. हे दोन्ही सामने जिंकून तेही क्वालिफायर १ च्या स्पर्धेत स्वतःला कायम राखण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुंबईला जिंकावे लागणार दोन्ही सामने
मुंबई इंडियन्सच्या मार्गात लखनौ सुपर जायंट्स व सनरायझर्स हैदराबाद आहे. मुंबईला दोन्ही सामने जिंकून क्वालिफायर १ मध्ये येण्याची संधी आहे. लखनौ सुपर जायंट्स १३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना मुंबई व कोलकाताचा सामना करायचा आहे. यापैकी एकही मॅच गमावणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
IPL 2023 Play Off Teams Interesting Next Matches