मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडियान प्रिमिअर लिग (आयपीएल)मध्ये गेल्या चार दिवसांत रंगतदार निकाल लागल्यामुळे प्ले-ऑफमध्ये धडक देण्याची चुरस वाढलेली आहे. आता १२ गुणांवर चार संघ असून एकमेकांच्या निकालावर त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे अवलंबून आहे.
मुंबईने सलग दमदार कामगिरी करत आगेकूच केली आहे. तर दुसरीकजे बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय संपादन करून पॉईंट टेबलचे गणीतच बिघडवून टाकले आहे. कारण आता सारख्या गुणांवर असलेल्या संघांमध्ये चुरस राहिली तर नेट रनरेटवर सारेकाही ठरेल आणि बंगळुरूने आपली ती बाजू भक्कम केली आहे. दुसरीकडे टॉपला असलेल्या संघांपैकी सध्या गुजरातचेच प्ले-ऑफमध्ये पोहोचणे निश्चित आहे.
कारण चेन्नईला कोलकाताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या पोझिशनला चॅलेंज मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. चेन्नईचा आता एकच साखळी सामना शिल्लक आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत त्यांना जिंकावा लागणार आहे. गुजरातचे दोन सामने शिल्लक असून त्यातील एक जिंकला तरीही त्यांना चालणार आहे. मुंबई सध्या तिसऱ्या क्रमांकावर आणि लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. दोघांकडेही अनुक्रमे १४ आणि १३ गुण आहेत. दोघांनीही पुढचे सगळे सामने जिंकले तर त्यांना जागेवरून हलवता येणार नाही. पण त्यांनी गडबड केली तर राजस्थान, बंगळुरू आणि कोलकातासाठी ही संधी असेल.
कारण १२ गुणांवर असलेल्या चारही संघांनी स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांच्यातील काही संघांनी पुढचे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकले तर मुंबई आणि लखनौसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आयपीएलचे शेवटचे साखळी सामने २१ तारखेला खेळले जातील आणि त्यानंतर २३ मेपासून प्ले-ऑफचे सामने सुरू होतील. त्यामुळे सात दिवस महत्त्वाचे असणार आहेत.
तर केकेआरचे भले
केकेआरचा सध्या एकच सामना शिल्लक असून त्यात त्यांनी विजय मिळवला तर १४ गुण होतील. पण तेवढ्याने त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचता येणार नाही. बंगळुरूने राजस्थानला, गुजरातने हैदराबादला, मुंबईने लखनौला, दिल्लीने पंजाबला, हैदराबादने बंगळुरूला, पंजाबने राजस्थानला आणि गुजरातने बंगळुरूला हरवले तर पंजाब आणि कोलकाताचे गुण सारखे होतील. आणि नंतर नेटरनरेटवर भवितव्य ठरेल.
IPL 2023 Play Off Scenario Points Table