नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्टी साठी गेलेल्या पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असले तरी या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह पंचक येथील गोदावरी नदी काठच्या जंगलात आढळून आला.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हा ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्रा सोबत पार्टी करण्यासाठी घरून मांसाहारी जेवण बनवून दुचाकीवर गेला होता. मात्र तो पुन्हा घरी आला नाही. कुटुंबियानी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर पत्नी साधना गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
पंचक येथील गोदावरी नदीकाठी भेटला मृतदेह
या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरचा शोध सुरु केला. पण, तो मिळाला नाही. मात्र सोमवारी दुपारी पंचक येथील गोदावरी नदी काठच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. गावातील सोमनाथ बोराडे हे आपल्या गायी-म्हशी घेऊन पंचक येथील गोदावरी नदी किनारी गेले होते. तेथे त्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यानी गावकऱ्यांच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
छातीवर खोलवर जखमा
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी याठिकाणी पंचनामा केला. याठिकाणी पुरूषाचा मृतदेह पालापाचोळ्याने झाकून ठेवल्याचे समोर आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या छातीवर खोलवर जखमा दिसून आल्या चेहऱ्यावर सिमेंट टाकलेले आढळून आले. मृतदेह सात ते आठ दिवसा पासून टाकून दिला असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.
नातेवाईकांनी ओळखले
पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह ज्ञानेश्वर गायकवाड याचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी काही संशयित तपासासाठी आणले असून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे यांनी बोलून दाखवले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.
The brutal murder of the missing youth of Panchak village who had gone to Nashik Road for a party