नवी दिल्ली – प्राप्तीकर विभागाच्या नव्या संकेतस्थळाचे अनावरण होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी संकेतस्थळाच्या तांत्रिक समस्यांचे पूर्ण निराकरण अद्याप झालेले नाही. हे संकेतस्थळ बनिवणा-या इन्फोसिसविरोधात कारवाईच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी समन्स पाठविला आहे. त्यांना सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राप्तीकर विभागाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अडीच महिन्यांनतरही संकेतस्थळ दुरुस्त होऊ शकले नाही. २१ ऑगस्टपूर्वी पोर्टल ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. याबाबत अर्थ मंत्रालयाकडून इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना समन्स पाठविण्यात आला असून, त्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे. प्राप्तीकर ई-फाइलिंग पोर्टलचे याच वर्षी ७ जूनला अनावरण करण्यात आले होते. संकेतस्थळ बनिवण्यापासून त्याच्या देखभालीची जबाबदारी इन्फोसिसला देण्यात आली होती. या संकेतस्थळामुळे ग्राहकांच्या समस्या कमी होऊन अधिक सोप्या पद्धतीने प्राप्तीकर भरला जाऊ शकणार होता. परंतु संकेतस्थळाचे अनावरण झाल्यापासूनच त्यामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २२ जूनला इन्फोसिसच्या अधिकार्यांसोबत बैठक घेऊन समस्यांबाबत चर्चा केली होती. लवकर सुधारणा करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. दोन-तीन आठवड्यांत पोर्टलच्या समस्या सोडविल्या जातील. लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे नंदन नीलकेणी यांनी आश्वासन दिले आहे. अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली होती.