मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसने उद्योजक गौतम अदानी यांना टार्गेट केले असताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आधार घेतल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये झालेल्या सिक्रेट बैठकीत नेमका कोणता अजेंडा दडला आहे, याची आता देशभर चर्चा सुरू आहे.
गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी दोघांव्यतिरिक्त कुणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे नेमका काय अजेंडा होता, हे कळू शकलेले नाही. विशेष म्हणजे ही बैठक नियोजित होती. अचानक ठरलेली नव्हती. काँग्रेसने सध्या गौतम अदानी यांच्या निमित्ताने सरकारला धारेवर धरले आहे. संसदेत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या संपत्तीत अचानक वाढ कशी झाली, असा प्रश्न सरकारला विचारला होता. त्याच प्रश्नाचा धागा पकडून संपूर्ण देशात भाजपविरोधी पक्ष सरकारच्या विरोधातील मोहीम राबवत आहेत.
अशातच देशातील भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अश्या शरद पवारांनी अदानींसोबत दोन तास नेमकी काय चर्चा केली असेल याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने संसदेत अदानी प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. परंतु, त्याची गरज नसून निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणे योग्य ठरेल, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी घेतली होती. जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करणे सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडेल, असे पवारांचे म्हणणे होते. पण तरीही काँग्रेसने जेपीसीची मागणी लावून धरलेली आहे. त्यामुळेच कदाचित अदानी यांनी पवारांच्या घरचा मार्ग पकडला असावा, असे बोलले जात आहे.
१० वाजून १० मिनीटे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हातील घड्याळात १० वाजून १० मिनीटे झालेली आहेत. बरेच राजकीय विनोद या वेळेवरून होतात. पण राष्ट्रवादीसाठी या वेळेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. अश्यात गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर सकाळी १० वाजून १० मिनीटांनी भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही वेळ अदानी यांनी निवडली की पवारांनी दिली, यावर सारेकाही अवलंबून आहे.
हिंडनबर्गचे भूत मानगुटीवर
हिंडनबर्गने अदानी उद्योग समुहाच्या विश्वासार्हतेवर जागतिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर गौतम अदानी संकटात आले. शेअर मार्केटमध्ये तर नुकसान झालेच शिवाय इतर उद्योगांवरही परिणाम झाला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने भारत जोडो यात्रेतून आणि संसदेतून अदानींना टार्गेट करायला सुरुवात केली.
Industrialist Gautam Adani Meet NCP Chief Sharad Pawar