मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये एका अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले असून मृतदेह त्यांच्या परिवाराकडे सोपवण्यात आला आहे. मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत किंवा डुंगरवाडीतील टॉवर ऑफ सायलेन्समध्ये सायरस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
मृत्यूनंतर आपण स्वर्गातच गेलो पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणूनच मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक समाजात आणि धर्मात या संस्काराच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. काही धर्मांमध्ये दहनविधी केला जातो. तर काही धर्मांमध्ये मृतदेह जमिनीत पुरला जातो. पण, पारसी समाजात अनोखी प्रथा आहे. मृतदेहाला गिधाडांच्या स्वाधीन केले जाते. सायरस यांचा मृतदेह सुद्धा गिधाडांच्या स्वाधीन केला जाणार आहे.
पारसी हा खूप जुना धर्म असून या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झाले की, मृत व्यक्तीचे शरीर ‘ त्या’ साठी शरीर एकांतात नेले जाते. त्या व्यक्तीचे मृत शरीर गिधाडांसाठी सोडतात. पारशी समुदाय हा अनेक दशकांपूर्वी भारतात येऊन स्थायिक झाला असला तरी त्यांनी आपली संस्कृती, धर्म आणि अन्य परंपरा कसोशीने जपल्या आहेत. पारशी समुदायात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना दाहसंस्कार किंवा मृतदेह पुरण्याचा संस्कार केला जात नाही.
पारशी समुदायाच्या परंपरेनुसार मृतदेह हा स्मशानभूमीत न नेता ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे ठेवला जातो. याठिकाणी गिधाडे हा मृतदेह खातात. अलीकडच्या काळात गिधाडांची संख्या कमी झाली असली तरी पारशी समाजात आजही अंत्यसंस्काराची ही परंपरा टिकून आहे. मुंबईत मलबार हिलच्या परिसरात ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आहे. हे ठिकाण चारही बाजूंनी झाडांनी वेढलेले आहे. ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये एक लोखंडी दरवाजा आहे. याठिकाणी सूर्यप्रकाशात मृतदेह ठेवले जातात. त्यामुळे मृतदेहांचे विघटन वेगाने होते. तसेच गिधाडं आणि इतर पक्षी हे मृतदेह खातात.
आजही अनेक पारशी कुटुंब या पारंपरिक पद्धतीने आपल्या आप्तजनांवर अंत्यसंस्कार करतात. पारशी मान्यतेनुसार मृतदेह जाळणे किंवा तो दफन करणे, हे निषिद्ध आहे. पारशी समुदायाच्या मान्यतेनुसार, मृतदेह हा खुल्यावर पक्ष्यांना खाण्यासाठी सोडला जातो कारण, मृत शरीर हे अशुद्ध असते, असा समज प्रचलित आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने मृतदेह हानीकारक असतो. त्यामुळे अग्नी अपवित्र होऊ शकतो, त्यामुळे मृतदेह जाळत नाहीत. तर मृतदेह पुरल्यास जमीन अशुद्ध होते, अशी धार्मिक भावना आहे. त्यामुळे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये गोलाकार जागेत सूर्यप्रकाश येईल, अशा ठिकाणी मृतदेह सोडले जातात. त्यानंतर गिधाडे हे मृतदेह खातात.
‘टॉवर ऑफ सायलेन्स’मधील मृतदेहांचे विघटन वेगाने शक्य होते. परंतु, आता मुंबईतील गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मधील मृतदेहांचे विघटन होण्यासाठी कित्येक दिवस जावे लागतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पारशी समुदायाकडून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सोलार कॉन्सट्रेटरचा वापर केला जातो. दुसरीकडे काही पारशी कुटुंबीयांनी हिंदूंप्रमाणे मृतदेहांवर दाहसंस्कार करायला सुरुवात केली आहे. मृतदेह ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये नेण्याऐवजी विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात.
पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते. निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो.
भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत. काही जण हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.
तंतोतंत धर्माचरण आणि परंपरा यांचा जबरदस्त पगडा असलेल्या पारसी समाजातील पुरोगामी गटाने अंत्यविधीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थिवावर ‘टॉवर ऑफ पीस’ऐवजी विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळी येथील स्मशानभूमीत प्रार्थना भवन उभारण्यात आले आहे. गिधाडांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने अंत्यविधीच्या पारंपरिक पद्धतीत समस्या उभ्या राहिल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पारसी समाजातील काही पुरोगामींनी पुढाकार घेतला आहे.
पारसी समाजाची आता मुंबईतील लोकसंख्या जेमतेम ४५ हजारांच्या आसपास आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबरच मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविधांगी विकासात या समाजाने बजावलेली भूमिकाही मोठी आहे. वेगळी जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि अंत्यविधीच्या नैसर्गिक प्रथेमुळे या समाजाची मुंबईत एक वेगळी ओळख आहे. मात्र गिधाडे नामशेष होऊ लागल्याने पारसींच्या अंत्यविधीची प्रथाच संकटात आली, व विद्युत दाहिनीच्या पर्यायावर समाजातील काही सुधारणावादी मंडळींनी गांभीर्याने विचार सुरू केला. मात्र, समाजातील काही परंपरावादी मंडळींनी याला विरोध दर्शवल्याने काहीसा पेच निर्माण झाला होता. मात्र, मुंबईतील समाजातील दानशूर व्यक्तींकडून जवळपास दीड कोटींचा निधी उभा करून येथे एक मोठे प्रार्थना भवन दहा महिन्यांपूर्वी बांधले. दर महिन्याला ८ते ९ याप्रमाणे आत्तापर्यंत ८० च्या आसपास दहनविधी व प्रार्थना करण्यात आल्याचे सांगितले जाते.
बॉम्बे पारसी पंचायतीने मात्र पारंपरिक झोरास्ट्रीयन अंत्यविधीचा पुरस्कार केला असून दहन करणे पारसी समाजाला निषिद्ध असल्याने ‘दहनविधी’ करणे चुकीचे असल्याचे पंचायतीचे अध्यक्ष याझ्दी देसाई यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अंत्यसंस्काराच्या विधीमुळे दोन वेगळे प्रवाह या समाजात निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यातच एका पारसी दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच वरळी येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. मुंबईत विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रार्थना भवनाची सोय असल्याचे समजल्याने त्यांच्या नातेवाईकांनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.
Industrialist Cyrus Mistri Cremation Tradition Parsi Religion