मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अनिल अंबांनी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपनीवर कथित गैरव्यवहार केल्याबाबत सेबीने निर्बंध लागू केले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेबीने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडवर कथित फसवणूक केल्याप्रकरणी निर्बंध घातले आहे. सेबीची ही कारवाई अमित बाफना, रवींद्र सुधाकर आणि पिंकेश आर शहा या तीन जणांवरही झाली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर गैरव्यवहाराविषयी अधिक माहिती उघड केली जाण्याची शक्यता आहे.
या कारवाईवर सेबीकडूनही प्रतिक्रिया जाहीर केली आहे. यात म्हटले आहे की, “सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थ, कोणतीही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनी किंवा कोणत्याही सार्वजनिक कंपनीचे कार्यवाहक संचालक / प्रवर्तक यांच्याशी संबंधित संस्थांना स्वतःला जोडण्यास मनाई आहे. भांडवल उभारणेही शक्य नाही. ” यापुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध असेच राहणार असून त्याचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. अनिल अंबानींच्या निर्बंध घातलेल्या कंपनी रिलायन्स होम फायनान्सच्या शेअर्सवर सध्या खूप दबाव आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शेअरची किंमत १.४० टक्क्यांनी घसरून ४.९३वर आली होती. कंपनीचे बाजार भांडवल २३८.८९ कोटी रुपये आहे. त्यामुळे बाजारातही या कंपनीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.