इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातले सर्वांत मोठे मंदिर – भाग -३
तिरुचिरापल्लीचे श्री रंगनाथ स्वामी मंदिर!
(क्षेत्रफळ 6,31,000 स्क्वेअर मीटर)
जगातील सर्वांत मोठी हिन्दू मन्दिरं या इंडिया दर्पण विशेष लेख मालेत आपण नेपाळ मधील श्री पशुपतीनाथ मंदिर आणि कम्बोडिया मधील अंग्कोरवाट या जगातील सर्वांत मोठ्या मंदिरांची माहिती पहिली. आज आपण भारतातले प्रथम क्रमांकाचे आणि जगातले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे हिन्दू मंदिर – श्री रंगनाथस्वामी मंदिराची माहिती घेणार आहोत.
तामिळनाडुतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर १३६ एकर जागेवर वसलेले आहे. म्हणजेच ६ लाख ३१ हजार चौरस मीटर एवढ्या विशाल क्षेत्रावर हे मंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर एवढे विशाल आहे की त्याचा परिघच ४११६ मीटर म्हणजे सुमारे १०७१० फुट एवढा आहे. आपल्या विशाल आकरमानामुळे श्री रंगनाथ स्वामी मंदिर जगातले तिसरे आणि देशांतले सर्वांत मोठे मंदिर म्हणून जगद मान्यता पावले आहे. इ.स. २०१७ मध्ये यूनेस्को या जागतिक संघटनेने एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा गटात या मंदिराचा ‘आवार्ड ऑफ़ मेरिट’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
आख्यायिका
कावेरी नदीच्या काठी तिरुचिरापल्ली येथे हे मंदिर कसे तयार झाले याविषयी एक सुप्रसिद्ध आख्यायिका येथे सांगितली जाते.
वैदिक काळात गौतम या नावाचे एक ॠषि गोदावरी नदीच्या काठी राहात होते. तिथे त्यांचा निसर्ग संपन्न आश्रम होता. आजुबाजुच्या परिसरांत पाण्याची कमी असुनही गौतम ॠषिंचा आश्रम मात्र हिरवळीने बहरलेला होता. त्यावेळी काही साधू गौतम ॠषिंच्या आश्रमात आले. गौतम ॠषिंनी त्यांची मनापासून सेवा केली. तिथले सौन्दर्य पाहून साधुंच्या मनांत इर्ष्या निर्माण झाली त्यांनी गौतम ॠषिंचा आश्रम हडप करण्यासाठी त्यांच्यावर गोहत्येचा आळ घेतला. या पापाचे प्रायश्चित घेण्यासाठी गौतम ॠषिंनी आपला आश्रम सोडला आणि ते दूर असलेल्या कावेरी नदीच्या काठी जावून भगवान विष्णुंची आराधना करू लागले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णु गौतम ॠषिंना प्रसन्न झाले. भगवान विष्णुंनी ही सर्व भूमी गौतम ॠषिंना दिली एवढेच नाही तर खुद्द ब्रह्मदेवाने येथे भगवान विष्णुसाठी मंदिर बांधले तेच हे श्री रंगनाथ स्वामी मंदिर.
रंगनाथ हे भगवान विष्णुचे एक नाव आहे. गौतम ॠषिंच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान विष्णु येथे कायमस्वरूपी निवास करुन राहिले. भगवान विष्णु यांच्या देशांतील १०८ मंदिरांत हे मंदिर अग्रभागी आहे. हे मंदिर म्हणजेच एक आश्चर्य आहे. हजारो वर्षांच्या मेहनती मुळे येथे जमिनीवर दगडांचा कलाकुसर युक्त स्वर्ग निर्माण झाला आहे असे म्हणता येईल.
तमिलनाडुच्या तिरुचिराप्ल्ल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम येथील श्री रंगनाथ स्वामी मंदिर हा द्रविड़ियन वस्तुशास्त्राचा जगप्रसिद्ध नमूना म्हणता येईल.येथे मुख्य मंदिरांत रंगनाथ (भगवान विष्णु) आणि रंगनायकी (लक्ष्मी) यांच्या मूर्ती आहेत.
प्राचीन तमिल संतकवी अलवारा यांनी लिहिलेल्या ४००० कविता आणि अभंग संग्रह दिव्य प्रबन्धम मध्ये श्री रंगनाथ स्वामी,रंगनायकी (मातालक्ष्मी) आणि येथील मंदिरांचे सुरेख गुणवर्णन केलेले आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये
हे मंदिर अत्यंत विशाल अशा 7 भागांत विभागले गेले आहेत. या भागांना येथे प्राकार म्हणतात. सातही भागांभोवती उंच आणि जाडजूड भिंतीचे संरक्षण आहे. या संरक्षक भिंतींची एकुण लांबी३२ हजार ५९२ फुट म्हणजे सुमारे ६ मैल एवढी मोठी आहे. या ६ मैल लांबीच्या अजस्त्र भिंतीतुन आतमध्ये जाण्यासाठी २१ मोठ मोठे गोपुरम म्हणजे प्रवेशद्वार तयार करण्यात आलेली आहेत. दक्षिण भारतातील वैष्णवांच्या या प्रथम क्रमांकाच्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरांत भगवान विष्णु यांची एक दोन नाहीत तर चक्कं ४९ मन्दिरं आहेत. यातले प्रत्येक मंदिर दगडी कलाकुसर युक्त असून. एकापेक्षा एक मंदिर मोठे आणि वैशिष्ट्ये पूर्ण आहे. हा मंदिर समूह म्हणजे भगवान विष्णु यांच्या मंदिरांचे टाउनशिप आहे असेच म्हणावे लागेल.
श्रीरंगनाथ स्वामी मंदिराच्या 7 भागांपैकी ४ भाग मंदिरानी व्यापले असून उरलेल्या तीन भागांत भाविक आणि पर्यटकासाठी होटेल्स,रेस्टोरेंट्स, फुलांचा बाजार, प्रेझेंटच्या वस्तूंची भव्य दुकानं त्याच प्रमाणे निवासी घरांचा देखील समावेश आहे. हे सगळ विचारांत घेउनही चिदम्बरम येथील नटराज मंदिर आणि थिरुआन्नामलै येथील अरुणाचलेश्वर या मंदिरांपेक्षा देखील हे मंदिर मोठे आहे.त्यामुळेच युनेस्कोने या मंदिराला ‘अॅवार्ड ऑफ़ मेरिट’ देऊन त्याचा यथोचित गौरव केला आहे.
श्रीरंगम मंदिराचा इतिहास
दक्षिण भारतातलं हे अतिशय देखणं आणि सुंदर वैष्णव मंदिर आहे. मंदिरा विषयी अनेक कथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हजार बाराशे वर्षांचा समृद्ध इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. मंदिरांत नवव्या दहाव्या शतकातील शिलालेख पहायला मिळतात. या काळांत या प्रदेशांवर चोला, पंडया, होयसाळ आणि विजय नगरचे सम्राट यांनी वेळोवेळी राज्य केले. मंदिरांत सध्या ज्या ठिकाणी भगवान रंगनाथन यांची प्रमुख मूर्ती आहे तेथे पूर्वी घनदाट जंगल होते.चोल वंशातील एक राजा शिकारीसाठी येथे आला असतांना एका पोपटामुलेत्याला येथे रंगनाथनची मूर्ती दिसली. त्यानंतर त्या राजाने या ठिकाणी जे मंदिर बांधले तेच हे जगातले सर्वांत मोठे हिन्दू मंदिर! चोला, पंडया, होयसळ आणि नायक या राजाघराण्यातील राज्यकर्त्यांनी वेळोवेळी मंदिराचे नुतनीकरण केली त्यांत वेळोवेळी मंदिरांची भर टाकली.त्यामुले च तमिल वास्तुकलेचे वैभव जगाला दाखविणारे हे मंदिर निर्माण झाले असा इतिहासकारांचा दावा आहे. या साम्राज्यांच्या अंतर्गत विविध मतभेद वादविवाद असूनही या मंदिर निर्मितीसाठी मात्र त्यांच्यात कायम एकमत राहिले त्यामुळ जागतिक दर्जाची अजरामर कलाकृतीयेथे निर्माण झाली.
उत्सव
यामंदिरांत वर्षभर विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. यात डिसेंबर-जानेवारी त वैकुंठ एकादशी चा २० दिवस चालणारा महोत्सव सर्वांत मोठा उत्सव असतो यावेळी लाखो भाविक येथे येतात. त्याच प्रमाणे ब्रह्मोत्सव (मार्च-एप्रिल), स्वर्ण आभूषण उत्सव (जून-जुलै), रथोत्सव (जानेवारी-फेब्रुवारी), वसंतोत्सव (में-जून), जेष्ठाभिषेक, श्रीजयंती हे उत्सव साजरे केले जातात. रंगनाथ स्वामी जन्मोत्सव देखील आठ दिवस चालतो. यावेळी कृष्ण दशमीच्या दिवशी कावेरी नदीत स्नान केल्यास अष्ट तीर्थ केल्याचे पुण्यप्राप्त होते असे म्हणतात याप्रसंगी लाखो भाविक कावेरी नदीत स्नान करतात.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री रंगनाथ स्वामी मंदिर,श्रीरंगम जिल्हा तिरुचिरापल्ली तमिलनाडु
फोन- (०४३१)२४३२२४६
लेखक – विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
India’s Most Largest Temple Shree Rangnath Swami Temple by Vijay Golesar