नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुपयाची डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण सुरूच आहे. आज रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे. चालू वित्तीय वर्षात रुपयाची आतापर्यंत सात टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली असून, संसदेच्या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रुपया घसरणीची आकडेवारी समोर आणली होती. रुपयाची होत असलेली घसरण पाहता ती आटोक्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान केंद्र सरकारपुढे उभे राहिले आहे.
गेल्या आठ वर्षात रुपयाची ३७ टक्के घसरण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर रुपया मजबूतीसह ५८.४० रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला होता. आठ वर्षानंतर रुपया आता ८० रुपयांवर पोहोचला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात २१.६० रुपयांच्या घसरणीसह रुपयांत ३७ टक्क्यांची घसरण झाली आहे. सत्तेत येण्यासाठी मोदी सरकारने रुपया घसरणीचा मुद्दादेखील केंद्रस्थानी ठेवला होता. परंतु, मोदी सरकारलाच आता रुपयाच्या घसरणीवरुन विरोधकांच्या टिकेला तोंड द्यावे लागत आहे.
रुपया घसरण्याचे कारण काय याविषयीही अनेक चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. नुकतेच लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीदेखील यावर भाष्य केलं. रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, प्रतिकूल आंतरराष्ट्रीय आर्थिक समीकरण ही रुपयाच्या घसरणीमागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ भारतीय रुपयाच नव्हे तर पाउंड, येन आणि यूरो चलनात देखील कमजोर होत असल्याचं स्पष्टीकरण सीतारमण यांनी दिले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ निर्यातदारांना होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंना अधिक किंमत मिळते. मात्र, आयातदारांना फटका बसतो. चढ्या भावाने वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे वस्तू महाग होतात आणि सर्वसामान्यांना या महागाईचा फटका बसतो. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारातून परकीय कर्ज घेणाऱ्या देशांना व्याजापोटी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. त्यामुळे रुपयाची घसरण आटोक्यात असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Indian Rupees Fall Modi Government Last 8 years Figure