नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा एल निनोचा प्रभाव असला तरी २०२३ मध्ये मान्सून सामान्य राहील, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने आज मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हे सलग पाचवे वर्ष आहे जेव्हा भारतात मान्सून सामान्य असेल. देशात मान्सूनचा हंगाम जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आगामी नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी होईल, अशी भीती यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. यासोबतच वेगवेगळ्या प्रदेशात पावसाचे असमान वितरण होत असल्याचेही सांगण्यात आले. पॅसिफिक महासागरात एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची चर्चा होती, मात्र आता मान्सून सामान्य राहणार असून एल निनोचा फारसा परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष हवामान विभागाच्या दुसऱ्या अंदाजाकडे लागून होते. मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वी हा अंदाज जाहीर केला जातो. सर्वसामान्यपणे हा अंदाज जवळपास अचूक असतो असा समज आहे. आणि आता देशात ९६ टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://www.facebook.com/India.Meteorological.Department/videos/203007789310354/?extid=CL-UNK-UNK-UNK-IOS_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB
Indian Meteorological Department Monsoon Forecast IMD