मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे हे आता जगजाहीर झालेले आहे. परंतु केवळ सामने पाहणे हा भारतीयांचा छंद किंवा आवड नसून कोणता खेळाडू कोणते विक्रम प्रस्थापित करतो आणि कुणाचे विक्रम मोडतो. हे देखील पाहणे उत्सुकतेचे असते. विशेषतः सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यासारख्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. परंतु आता यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडणार आहे.
सध्या भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामना रंगत असून या सामन्यांमध्ये रोहित शर्मा आपल्याच दोन वरिष्ठ सहकारी खेळाडूंचे विक्रम मोडण्याची शक्यता आहे पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधार म्हणून रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. आता दोन्ही देशांमधील या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यात भारताचे दोन मोठे दिग्गज सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम रोहित शर्मा मोडणार आहे.
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत एकूण 1011 धावा केल्या आहेत. त्याचवेळी या संघाविरुद्ध भारतीय सलामीवीर म्हणून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याच्या नावावर 1024 धावा आहेत, तर सौरव गांगुली 1015 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 5 धावा केल्यावर तो गांगुलीच्या पुढे जाईल, तर 14 धावा करताच तो तेंडुलकरला मागे सोडेल. आणि कॅरेबियन संघाविरुद्ध, भारतीय सलामीवीर वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत नंबर वन बनेल.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणारे तीन भारतीय फलंदाज- 1024 धावा – सचिन तेंडुलकर, 1015 धावा – सौरव गांगुली, 1011 धावा – रोहित शर्मा. असा क्रम सध्या आहे. रोहित शर्माचा वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत एकूण 35 एकदिवसीय सामने खेळले असून 33 डावांत त्याने सरासरी 1588 धावा केल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याने 3 शतके आणि 12 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 162 धावा आहे.