कोईम्बतूर – भारतीय हवाई दलातील एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संवेदनशील असलेल्या या प्रकरणात हवाई दलाच्या प्रशासकीय महाविद्यालयातील फ्लाइट लेफ्टनंटचा समावेश आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी भारतीय हवाई दलाकडे सोपवावे, असे निर्देश अतिरिक्त महिला न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, एअर फोर्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमधील २८ वर्षीय वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्याने हवाई दलाचे फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुख यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरमुख यांना कॉलेज कॅम्पसमध्ये अटक केली. संशयित आरोपी अमितेश हरमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पीडित महिला आणि संशयित आरोपी दोघेही छत्तीसगडचे रहिवासी असून ते एका प्रशिक्षण कोर्समध्ये एकत्र होते. रात्री मेसमध्ये एका पार्टीला उपस्थित होते. महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पायाच्या दुखापतीवर औषध घेतल्यानंतर ती झोपली असताना ही घटना घडली. तसेच लैंगिक अत्याचारानंतर नशेत असलेल्या अधिकाऱ्याने तिला मारहाण केली.
अत्याचार झाल्यानंतर दोन विंग कमांडर मला म्हणाले की, तक्रार दाखल करु नये किंवा प्रकरण परस्पर संमतीचे आहे असे लिहून देण्यास सांगितले, मात्र या दबावानंतरही मी शहर पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली, असे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हवाई दलाने न्यायालयात याचिका दाखल केली की, स्थानिक पोलिसांना अधिकाऱ्याला अटक करण्याचा अधिकार नाही. संरक्षण न्यायालय हे एकमेव अधिकार क्षेत्र असून तेथे कोर्ट मार्शल करता येते, त्यामुळे आरोपींना हवाई दलाच्या ताब्यात द्यावे. आता याप्रकरणी कोर्ट मार्शल होणार आहे.