नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. युनेस्कोने X या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणाले; “भारतासाठी अधिक अभिमानास्पद! होयसळ राजघराण्याचे भव्य पवित्र स्थापत्य कलाअवशेष युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. होयसळ मंदिरांचे कालातीत सौंदर्य आणि कलात्मकता हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि आपल्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचे पुरावे आहेत.”
मराठी विश्वकोषामध्ये होयसळ वंशाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बहुतेक होयसळ वंशी राजे जैन धर्मीय असून त्यांनी अनेक जैन पंडितांना व विद्वानांना आश्रय दिला होता. विनयादित्याच्या कारकीर्दीत वर्धमानदेव ह्या जैन साधूस होयसळांच्या व्यवस्थापनात अनन्यसाधारण स्थान होते. इरेयंग आणि पहिला बल्लाळ यांच्यावर जैन अध्यात्मगुरूंचा प्रभाव होता.
या राजांनी जैन मंदिरांना सढळ हाताने देणग्या दिल्या होत्या. या राजांपैकी विष्णुवर्धन हा पराक्रमी, शूर व श्रेष्ठराजा होता. त्याचे गुरू रामानुजाचार्य यांनी या जैन राजाला वैष्णव धर्माची दीक्षा दिली (१११६) आणि विष्णुवर्धनदेव असे त्याचे नवे नामकरण केले. या राजाच्या मदतीने मेलकोटे येथे विष्णूचे मंदिर बांधले. तसेच तळकाड व तोन्नर (रामानुजाचे गाव) या ठिकाणी विष्णूची मंदिरे बांधली. वैष्णवांना व ब्राह्मणांना अग्रहार दिले. बेलूर येथे विजय नारायण मंदिर बांधले.
PM hails inclusion of Sacred Ensembles of Hoysalas in UNESCO World Heritage List