सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथोरिटीने अपर वैतरणा कडवा देवलिक या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर केला असून या प्रकल्पाची एकूण किमत सुमारे साडेसात हजार कोटी इतकी आहे. या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा पाण्याचा तसेच भविष्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉअरसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.
सिन्नर तालुका हा ७०० मीटर उंची असून, वर्षानुवर्षे हा दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यात सततच भीषण पाणीटंचाई असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायमचाच निकाली निघावा यासाठी तालुक्यातील विविध पक्षांच्या आणि सामाजिक कार्यकत्यांच्या शिष्टमंडळांनी खासदार गोडसे यांची भेट घेत त्यांना साकडे घातले होते. यातूनच खासदार गोडसे यांनी तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते.
वैतरणा खाडीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात टाकल्यास सिन्नर तालुक्यासाठी साडेसहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल हे खा. गोडसे यांनी जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. खा. गोडसे यांनी शासन दरबारी सततचा पाठपुरावा करत शासनाला प्रस्तावित अपर वैतरणा कडवा देवलिंक नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि डीपीआर तयार करण्यास भाग पाडले. दर प्रकल्पाचा पीएफआर सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केला असून, डीपीआर करण्यासाठी २३ कोटी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले होते.
या नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याची जबाबदारी शासनाने नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथोरिटीन कंपनीकडे सोपविली होती. सदर कंपनीकडून डिपीआर तयार करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. कंपनीने नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.
ही नदीजोड प्रकल्पाच्या अंतिम अहवालास तातडीने राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्प उभारणीसाठी निधीच्या तरतुदीसाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. यावेळी जलचितन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव उपस्थित होते.
सिन्नर तालुक्याला मिळणार साडेसहा टीएमसी पाणी या प्रकल्पाचा फायदा सिन्नरसह निफाड तालुक्यालाही हेणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या साडेसहा टीएमसी पाण्यापैकी ६१.६२ दलघमी पाणी सिंचन क्षेत्रासाठी, २४ दलघमी पाणी पिण्याच्या वापरासाठी, ४० दलघमी पाणी देव नदीत सोडून सिंचन क्षेत्राच्या पुनर्स्थापनेसाठी उपयोगात येणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या प्रकल्पासाठी २३.७५ दलघमी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे एकट्या सिन्नर तालुक्यासाठी तब्बल साडेसहा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
Final report of river connection project to Govt