अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरांकडून पोलिसांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या चोरीची तक्रार सुहास दादासाहेब वारे यांनी दिली होती, त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेच्या स्वागतानिमित्त गेल्या आठवड्यात जामखेड येथील खर्डा चौकात स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या गळयातील अडीच तोळे वजनाची सोनसाखळीची चोरी झाली होती. पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत खर्डा चौक येथे गर्दीमध्ये लोकांचे खिसे, पाकीट चाचपडताना दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.
या संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ, अशोक बबन जाधव (दोघे रा. पेठ बीड, ता. जि. बीड), असे या सोनसाखळी चोरांचे नाव आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली अडीच तोळे वजनाची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. ह दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवर विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
Two thieves who stole Pankaja Munde’s gold chain during Shivshakti Yatra, arrested