इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – ऐकावे ते नवलच अशी स्थिती उत्पन्न करणारी घटना पुण्यातील ससून रुग्णालयात घडली आहे. पोलिसांनी गुन्हेगाराला पाठिशी घालण्यासाठी पैसे घेतल्याचे आपण ऐकले होते. मात्र इथे तर चक्क डॉक्टरांनीच गुन्हेगाराला पाठिशी घातले आणि त्यासाठी दिवसाला ७० हजार म्हणजे आठवड्याला जवळपास ५ लाख रुपये घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील याने हा कारनामा करून दाखवला आहे. ललितला तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली. पण पुढे प्रकृतीच्या कारणाने त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून तो ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. विशेष म्हणजे त्याला आधीच डिस्जार्ज द्यायला पाहिजे होता. मात्र ससूनमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याने डॉक्टरांना मॅनेज केले.
त्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा काही साधासुधा नाही. त्यानेही चांगली माया जमवलेली आहे. तो ब्रांडेड कारमधून रुग्णालयात येतो. त्यानेच अतिवरिष्ठांना मॅनेज केले आणि ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी दररोज ७० हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानुसार ललित पाटील या रुग्णालयातील अतिवरीष्ठ डॉक्टरांना दररोज ७० हजार प्रमाणे आठवड्याचे पैसे रोख द्यायचा.
मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी
त्या जोरावर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी करायचा, असे उघडकीस आले आहे. या वॉर्डात त्याची पूर्ण बडदास्त ठेवण्यात आली. विशेष म्हणजे ड्रग्स नेटवर्क संपर्कात ठेवण्यासाठी त्याच्याकडे सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल्सही होते.
Drug racket running from Sassoon? Doctors get Rs 5 lakh per week from mafia…