गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दोन विषयावरच आले बहुतेक पत्र, मन की बात मध्ये केला खुलासा

by Gautam Sancheti
सप्टेंबर 24, 2023 | 2:48 pm
in राष्ट्रीय
0
Narendra Modi e1666893701426

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन विषयावरच बहुतेक अले असून त्यांनी मन की बात मध्ये त्याचा खुलासा केला. आज मन की बातमध्ये ते आज कोणत्या कोणत्या विषयावर बोलले याची संपूर्ण माहिती त्यांच्या भाषणातून जाणून घ्या… संपूर्ण भाषण पुढे वाचा…..

माझ्या प्रिय कुटुंबियांनो नमस्कार!
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे – ‘चंद्रयान-3 महाक्विझ’. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.

माझ्या कुटुंबियांनो, चंद्रयान-3च्या यशानंतर, जी-20च्या भव्य आयोजनाने प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला. भारत मंडपम तर स्वतःच एखाद्या सेलिब्रिटी-मान्यवरासारखा झाला आहे. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत आणि अभिमानाने ते पोस्ट करत आहेत. या शिखर परिषदेत भारतानं, आफ्रिकी महासंघाला जी-20 समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्या काळात भारत खूप समृद्ध होता, त्या काळात आपल्या देशात आणि जगात, सिल्क रूट-रेशीम व्यापार मार्गाचा खूप बोलबाला होता. हा रेशीम मार्ग, व्यापार-आर्थिक उलाढालींचे प्रमुख माध्यम होता. आता आधुनिक काळात भारताने जी-20 परिषदेत, आणखी एक आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा, भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे. हा कॉरिडॉर येणारी शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार आहे आणि या कॉरिडॉरची सुरुवात भारतीय भूमीवर झाली, याची नोंद इतिहासात कायम राहील.

मित्रांनो,आज जी-20च्या अध्यक्षीय कारकीर्दीदरम्यान भारताची युवा शक्ती या परिषदेसोबत ज्याप्रकारे कार्यरत राहिली, त्याबद्दल एक विशेष चर्चा आवश्यक आहे. वर्षभरात देशातील अनेक विद्यापीठांमध्ये जी-20शी संबंधित कार्यक्रम झाले. आता या मालिकेत दिल्लीत आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे – ‘जी-20 University Connect Programme’. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यापीठांमधले लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालये यांसारख्या अनेक प्रतिष्ठित शिक्षण संस्थाही यात सहभागी होणार आहेत. मला असं वाटतं की जर तुम्हीही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर, तुम्ही 26 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम जरूर पहा आणि त्यात सहभागी व्हा. भारताच्या भविष्य काळाबाबत आणि तरुणांच्या भविष्यावर आधारीत अनेक रंजक गोष्टी, या कार्यक्रमात असणार आहेत. मी स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मी देखील माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची वाट पाहत आहे.

माझ्या कुटुंबियांनो,
आजपासून दोन दिवसांनी 27 सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ आहे. काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे एक माध्यम म्हणून पाहतात, मात्र पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. असं म्हटलं जातं की, जर कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे कुठले क्षेत्र असेल तर ते आहे पर्यटन क्षेत्र! पर्यटन क्षेत्राची भरभराट करताना, कोणत्याही देशासाठी, या क्षेत्राबद्दल सद्भावना बाळगणे, वाढवणे आणि आकर्षण तसेच त्याची ख्याती वाढवणे खूप महत्त्वाचे ठरते. गेल्या काही वर्षांत भारताबद्दलचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर जगभरातील लोकांचा भारतातील रस आणखी वाढला आहे.

मित्रांनो,
जी-20 परिषदेसाठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले. इथली विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारची खाणे-पिणे आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली. इथे आलेले प्रतिनिधी आपापल्या देशात परत जाताना आपल्या सोबत जे सुखद अनुभव घेऊन गेले आहेत, त्यामुळे भारतात पर्यटन आणखी वाढीला लागेल. आपणा सर्वांना माहितच आहे की भारतात एकापेक्षा एक सरस अशी जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातील पवित्र होयसडा मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मी, हा शानदार असा मान मिळाल्याबद्दल, सर्व देशवासियांचं अभिनंदन करतो. मला 2018 मध्ये शांती निकेतनला भेट देण्याचं भाग्य लाभलं होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे शांती निकेतनशी निगडीत होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका प्राचीन संस्कृत श्लोकातून शांतीनिकेतनचे ब्रीदवाक्य-ध्येयवाक्य घेतले होते. तो श्लोक असा आहे –

“यत्र विश्वं भवत्येक नीदम्”
म्हणजेच, एक लहान घरटे संपूर्ण जग सामावून घेऊ शकते.
युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेली कर्नाटकातील होयसडा मंदिरे, 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेसाठी ओळखली जातात. या मंदिरांना युनेस्कोकडून मान्यता मिळणे, हा देखील भारतीय मंदिर स्थापत्य शैलीच्या, भारतीय परंपरेचा सन्मान आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता 42 झाली आहे. भारताचा हाच प्रयत्न आहे की आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे, जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. विविध राज्यांची संस्कृती समजून घ्या, वारसा स्थळे पहा. यामुळे आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी तर परिचित व्हालच, सोबत स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवण्याचं तुम्ही एक महत्त्वाचं माध्यम देखील ठराल.

माझ्या कुटुंबियांनो,
भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत आता जागतिक बनले आहे. जगभरातील लोकांचा त्यांच्याकडे असलेला ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. मी आपल्याला एका छानशा मुलीने केलेल्या सादरीकरणातील एक छोटीशी ध्वनीफीत ऐकवतो…हा आवाज ऐकून तुम्ही देखील चकीत झाला असाल ना? तिचा आवाज किती गोड आहे आणि प्रत्येक शब्दातून जे भाव व्यक्त होत आहेत, त्यातून तिचे देवाशी असलेले प्रेमपूर्वक नाते आपण अनुभवू शकतो. जर मी तुम्हाला सांगितले की हा मधुर आवाज जर्मनीतील मुलीचा आहे, तर कदाचित तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. या मुलीचे नाव आहे – कैसमी! 21 वर्षांची कैसमी सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजतेय. मूळची जर्मनीची असलेली कैसमी भारतात कधीच आलेली नाही, मात्र ती भारतीय संगीताची चाहती आहे. जिने भारत कधी पाहिलाही नाही, तिला भारतीय संगीताची असलेली आवड खूप प्रेरणादायी आहे. कैसमी जन्मापासूनच दृष्टीबाधित आहे, मात्र हे कठीण आव्हान तिला असामान्य कामगिरी करण्यापासून रोखू शकलेलं नाही. संगीत आणि सर्जनशीलतेचा तिला एवढा ध्यास होता की तिने बालवयापासूनच गाणे सुरू केले. आफ्रिकी ड्रमवादनाची सुरुवात तर तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी केली. भारतीय संगीताचा परिचय तिला 5-6 वर्षांपूर्वीच झाला. भारतीय संगीतानं तिला इतकी भुरळ घातली, इतकी भुरळ घातली, की ती त्यात पूर्णपणे लीन झाली. ती तबलावादनही शिकली आहे. सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे तिने अनेक भारतीय भाषांमध्ये गाण्यात प्रभुत्व मिळवले आहे. संस्कृत, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, आसामी, बंगाली, मराठी, उर्दू, या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्याला दुसऱ्या अनोळखी भाषेत दोन-तीन ओळी बोलायच्या असतील तर किती अवघड असते! पण कैसमीसाठी ही बाब म्हणजे हातचा मळ आहे. तुम्हा सर्वांसाठी मी, तिने कन्नडमध्ये गायलेले एक गाणे इथे वाजवत आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल जर्मनीच्या कैसमीला असलेले हे वेड कौतुकास्पद आहे. मी मनापासून तिचे कौतुक करतो. तिचा हा प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारा आहे.

माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या देशात शिक्षणाकडे नेहमीच एक सेवा म्हणून पाहिले जाते. मला उत्तराखंडमधील काही युवकांविषयी कळले आहे, जे याच भावनेने मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. नैनिताल जिल्ह्यातील काही तरुणांनी मुलांसाठी अनोखे असे घोडा वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अगदी दुर्गमातील दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत आणि एवढेच नाही तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. आतापर्यंत या माध्यमातून नैनितालमधील 12 गावे सामावून घेण्यात आली आहेत. मुलांच्या शिक्षणाशी निगडीत या उदात्त कामात मदत करण्यासाठी स्थानिक लोकही स्वतःहून पुढे येत आहेत. या घोडा वाचनालयाच्या माध्यमातून, दुरदूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त ‘कविता’, ‘कथा’ आणि ‘नैतिक शिक्षणावरील’ पुस्तके वाचण्याची संधी पूर्णपणे मिळावी, असा प्रयत्न केला जात आहे. हे अनोखे वाचनालय मुलांनाही खूप आवडते.

मित्रांनो, मला हैदराबादमधल्या ग्रंथालयाशी संबंधित अशाच एका अनोख्या प्रयत्नाची माहिती मिळाली. तिथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ‘आकर्षणा सतीश’ या मुलीने चमत्कार केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी, ती मुलांसाठी एक- दोन नव्हे तर सात ग्रंथालये चालवत आहे. दोन वर्षांपूर्वी आकर्षणा, जेव्हा तिच्या आई वडिलांबरोबर कर्करोग रुग्णालयात गेली, तेव्हा आकर्षणाला याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील गरजूंना मदत करण्यासाठी तिथे गेले होते. तेथील मुलांनी तिला ‘रंगवण्याच्या पुस्तकांसंबंधी’ विचारले आणि ही गोष्ट या गोंडस बाहुलीला इतकी भावली, की तिने विविध प्रकारची पुस्तके गोळा करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या शेजारची घरे, नातेवाईक आणि मित्रांकडून पुस्तके गोळा करण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की त्याच कर्करोग रुग्णालयात मुलांसाठीचे पहिले ग्रंथालय उघडण्यात आले. या मुलीने आतापर्यंत गरजू मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेली सात ग्रंथालयांमध्ये आता सुमारे 6 हजार पुस्तके आहेत. छोट्याशा ‘आकर्षणा’ने ज्या पद्धतीने मुलांच्या भविष्यासाठी मोठं काम केलं आहे, त्यापासून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
मित्रांनो, हे खरे आहे की आजचे युग डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-पुस्तकांचे आहे. पण तरीही पुस्तके नेहमीच आपल्या जीवनात चांगल्या मित्राची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, आपल्या शास्त्रात म्हटले आहे- जिवेशू करुणा चापी, मैत्री तेशू विधियतामम्हणजेच, सजीवांवर दया करा आणि त्यांना तुमचे मित्र बनवा. आपल्या बहुतेक देवी-देवतांचे वाहन प्राणी आणि पक्षी आहेत. अनेक लोक मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेतात; पण त्यांचे वाहन असणाऱ्या प्राण्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत. हे प्राणी आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत, आणि आपण शक्य तितके त्यांचे संरक्षण देखील केले पाहिजे. गेल्या काही वर्षांत देशात सिंह, वाघ, बिबटे आणि हत्तींच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे. या पृथ्वीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांना वाचवण्यासाठी आणखीही अनेक प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. असाच एक अनोखा प्रयत्न राजस्थानातील पुष्कर येथे केला जात आहे. तिथे सुखदेव भट्टजी आणि त्यांची टीम वन्यजीव वाचवण्यात गुंतलेली आहे, आणि त्यांच्या टीमचे नाव काय आहे माहीत आहे? त्याच्या टीमचे नाव आहे- कोब्रा. हे धोकादायक नाव त्यांनी टीमला दिलय, कारण त्याची टीम या भागातील धोकादायक सापांना वाचवण्यासाठी देखील काम करते. या चमूशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत, जे केवळ एका फोन कॉलवर घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांच्या मोहिमेत सामील होतात. सुखदेवांच्या या चमूने आतापर्यंत 30 हजारांहून अधिक विषारी सापांचे प्राण वाचवले आहेत. या प्रयत्नामुळे केवळ लोकांचा धोका दूर झाला नाही तर निसर्गाचे संवर्धनही होत आहे. हा गट इतर आजारी प्राण्यांची सेवा करण्याच्या कार्याशी देखील संबंधित आहे.

मित्रांनो, तामिळनाडूतील चेन्नई इथले ऑटोचालक एम. राजेंद्र प्रसादजी देखील एक आगळेवेगळे काम करत आहेत. ते गेल्या 25-30 वर्षापासून कबुतरांची सेवा करत आहे. त्याच्या स्वतःच्या घरात 200 हून अधिक कबुतरे आहेत. ते पक्ष्यांचे अन्न, पाणी, आरोग्य यासारख्या प्रत्येक आवश्यकतांची काळजी घेतात. त्यासाठी त्याना खूप पैसेही मोजावे लागतात, पण ते त्याच्या कामासाठी वचनबद्ध आहेत. मित्रांनो, लोक उदात्त हेतूने असे काम करताना पाहून खरोखरच खूप प्रेरणा आणि आनंद मिळतो. जर तुम्हालाही अशा काही अनोख्या प्रयत्नांची माहिती मिळाली, तर ती जरूर शेअर करा.

माझ्या प्रिय कुटुंबियानो, स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ हा देशासाठी प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा काळ देखील आहे. आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो, आपल्या इतच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकतो. कर्तव्याची भावना आपल्या सर्वांना एकत्र आणते. उत्तर प्रदेशच्या संभल मध्ये देशाने कर्तव्याचे जे उदाहरण पाहिले आहे, जे मला तुमच्यासोबतही शेअर करायचे आहे. कल्पना करा, 70 हून अधिक गावे आहेत, हजारो लोक आहेत आणि सगळे मिळून एक लक्ष्य, एक ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात, हे फार दुर्मिळ आहे, परंतु संभळच्या लोकांनी ते केले. या लोकांनी एकत्रितपणे लोकसहभाग आणि सामूहिक कामाचे एक उत्तम उदाहरण दाखवले आहे. खरे तर अनेक दशकांपूर्वी या भागात ‘सोत’ नावाची एक नदी होती. अमरोहापासून सुरू होऊन संभळमधून बदायूंला वाहणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात असे. या नदीला पाण्याचा अखंड प्रवाह होता, जो येथील शेतकऱ्यांसाठी शेतीचा मुख्य आधार होता. कालांतराने, नदीचा प्रवाह कमी झाला, ज्या मार्गांवरून नदी वाहत होती त्यावर अतिक्रमण झालं आणि नदी नामशेष झाली. नदीला आपली माता मानणाऱ्या आपल्या देशात संभळच्या लोकांनी या सोत नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 70 हून अधिक ग्रामपंचायतींनी मिळून सोत नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. ग्रामपंचायतीतल्या लोकांनी सरकारी विभागांनाही बरोबर घेतले; आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत या लोकांनी नदीचा 100 किलोमीटरहून अधिक भाग पुनरुज्जीवित केला होता. पावसाळा सुरू झाला तेव्हा येथील लोकांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि सोत नदी पाण्याने भरली गेली. इथल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची घटना ठरली. लोकांनी नदीच्या काठावर 10 हजारांहून अधिक बांबूची रोपे लावली, ज्यामुळे तिचे किनारे पूर्णपणे सुरक्षित राहतील. डासांची पैदास होऊ नये म्हणून गांबुसियाचे तीस हजारांहून अधिक मासेही नदीच्या पाण्यात सोडले गेले आहेत. मित्रांनो, सोत नदीचे उदाहरण आपल्याला सांगते की जर आपण दृढनिश्चय केला तर आपण सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो आणि मोठा बदल घडवून आणू शकतो. कर्तव्याच्या मार्गावर चालताना तुम्ही देखील तुमच्या सभोवतालच्या अशा अनेक बदलांचे माध्यम बनू शकता.

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, जेव्हा हेतू दृढ असतो आणि काहीतरी शिकण्याचा उत्साह असतो, तेव्हा कोणतेही काम कठीण राहत नाही. पश्चिम बंगालच्या श्रीमती शकुंतला सरदार यांनी हे अगदी खरे असल्याचे सिद्ध केले आहे. ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. शकुंतलाजी जंगलमहालमधील सतनाला गावच्या रहिवासी आहेत. बऱ्याच काळापासून तिचे कुटुंब रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. तिच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करणेही कठीण होते. मग त्यांनी एका नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि यश मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी हे कसे केले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल! तर त्याचं उत्तर आहे- एक शिवण यंत्र. एका शिवण यंत्राच्या माध्यमातून त्यांनी ‘साल’च्या पानांवर सुंदर डिझाईन्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कौशल्याने संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलले. त्याने बनवलेल्या या अद्भुत हस्तकलेची मागणी सातत्याने वाढत आहे. शकुंतलाजी यांच्या या कौशल्याने केवळ त्यांचेच नव्हे तर ‘साल’ ची पाने गोळा करणाऱ्या अनेक लोकांचेही जीवन बदलले आहे. आता त्या अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहे. तुम्ही कल्पना करू शकता, एकेकाळी वेतनावर अवलंबून असलेले कुटुंब आता इतरांना रोजगारासाठी प्रेरित करत आहे. दैनंदिन वेतनावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाला तिने स्वतःच्या पायावर उभे केले आहे. यामुळे तिच्या कुटुंबाला इतर गोष्टींवरही लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, शकुंतलाजींची स्थिती सुधारताच त्यांनी बचत करायला सुरुवात केली. आता तिने जीवन विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. शकुंतलाजी यांच्या कार्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच. भारतातील लोक अशा प्रतिभांनी भरलेले आहेत- तुम्ही त्यांना संधी द्या आणि ते काय करतात ते पहा.

माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेतले ते दृश्य कोण विसरू शकेल? जेव्हा अनेक जागतिक नेते राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत, याचा हा एक मोठा पुरावा आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छतेशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा मला आनंद आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा” मोहीम जोरात सुरू आहे. Indian Swachhata League मध्येही उत्तम सहभाग मिळतो आहे.

आज मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून सर्व देशवासियांना एक विनंती करू इच्छितो – की दिनांक 1 ऑक्टोबरला, रविवारी सकाळी 10 वाजता स्वच्छतेवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आपणही आपला वेळ काढून स्वच्छतेशी संबंधित या मोहिमेत सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या रस्त्यावर, परिसरात, उद्यानात, नदीत, तलावात किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि जिथे जिथे अमृत सरोवर बांधले गेले आहेत तिथे तर स्वच्छता आवश्यकच आहे. ही स्वच्छता मोहीम गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. गांधी जयंतीच्या या प्रसंगी खादीचे काहीना काही उत्पादन खरेदी करण्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे.

माझ्या कुटुंब सदस्यांनो,आपल्या देशात सणांचा हंगामही सुरू झाला आहे. तुम्ही सर्वजण घरी काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल. काहीजण त्यांचे शुभ कार्य सुरू करण्यासाठी नवरात्रीची वाट पाहत असतील. उत्साह आणि आशादायक अशा वातावरणात आपण vocal for local हा मंत्र देखील जरूर लक्षात ठेवा. जिथे शक्य होईल तिथे आपण भारतात तयार झालेला माल खरेदी करा. भारतीय उत्पादनांचा वापर करा.आणि भेट देताना मेड इन इंडिया उत्पादनेच भेट द्या. तुमच्या छोट्याशा आनंदामुळे दुसऱ्याच्या कुटुंबाला देखील मोठा आनंद मिळेल. तुम्ही खरेदी करता त्या भारतीय वस्तूंचा थेट फायदा आमचे कामगार, मजूर, कारागीर आणि इतर विश्वकर्मा बंधू-भगिनींना होईल. आजकाल, अनेक स्टार्टअप्स स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहेत. जर तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी केल्या तर स्टार्ट अप्सच्या या तरुणांना देखील फायदा होईल.

माझ्या प्रिय कुटुंब जनहो, ‘मन की बात’ मध्ये आज इथेच थांबतो. पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला ‘मन की बात’ मध्ये भेटेन, तेव्हा नवरात्र आणि दसरा झाला असेल. या सणासुदीच्या काळात तुम्ही प्रत्येक सण उत्साहात साजरा करा. तुमच्या कुटुंबातला प्रत्येकजण आनंदी राहो- ह्याच माझ्या शुभेच्छा. पुढच्या वेळी, नवीन विषय आणि देशबांधवांच्या नवीन यशोगाथांसह पुन्हा भेटूया. तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत रहा, तुमचे अनुभव सांगण्यास विसरू नका. मी वाट बघेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बाप्पाचे विसर्जन करा घरीच… नाशिक मनपा देणार ही पावडर विनामूल्य… येथे साधा संपर्क…

Next Post

यापुढे अर्थखाते टिकेल की नाही, हे सांगता येत नाही; अजित पवार यांच्या या विधाना नंतर रंगली ही राजकीय चर्चा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Next Post
ajit pawar 111

यापुढे अर्थखाते टिकेल की नाही, हे सांगता येत नाही; अजित पवार यांच्या या विधाना नंतर रंगली ही राजकीय चर्चा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011