इंडिया दर्पण वृत्तसेवा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेत नाशिकचे सोहम काळे, वैभव हळदे, कुणाल कलसे आणि विवेक केतकर यांनी उज्ज्वल यश मिळवले. जुलै महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेतुन संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १९७ उमेदवारांमधून पहिल्या ८० जणांत नाशिकच्या सात जणांची पुढील टप्प्याच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी निवड झाली होती. या लेखी परीक्षेत नाशिकच्या विवेक केतकर यांनी सर्वप्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत वरील चौघांनी ८० टक्क्यांवर गुण मिळवत पहिल्या ४८ जणांच्या गुणवत्ता यादीत येत उत्तम यश मिळविले. या एकंदर समग्र परीक्षेच्या अंतिम निकालात विवेक केतकर यांनी महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळवला. सोहम काळे यांनी आठवा तर वैभव हळदे यांनी नववा क्रमांक मिळवला. मुळचे नाशिकचे वैभव कटोरे यांनी देखील या यादीत स्थान मिळवले आहे.
नाशिकच्या या चारही पंचांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंच समिति (एमसीए पॅनल) वर नियुक्ती होत आहे. यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, महाराष्ट्रभर दरवर्षी नियमितपणे होणाऱ्या , राज्यस्तरीय खुल्या तसेच विविध वयोगटातील आमंत्रितांच्या (इन्व्हिटेशन) क्रिकेट स्पर्धेत पंचगिरीसाठी या पंचांना प्राधान्य मिळेल .
या सर्वांना आंतरराष्ट्रीय सामन्यातील अनुभवी पंच व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच समिति प्रमुख विनीत कुलकर्णी , रणजी सामन्यातील पंच संदीप चव्हाण, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच कमिटी सदस्य संदीप गांगुर्डे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्वच पंचांना नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे, तसेच चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, सीईओ रतन कुयटे, समन्वयक सर्वेश देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनल परीक्षेतील यशाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सचिव समीर रकटे यांनी चौघांचेही खास अभिनंदन करून यापुढील कारकीर्दी साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Four people from Nashik on the Maharashtra Cricket Association’s state-level umpire panel