शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनची मागणी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे प्रभाग २४ मध्ये विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. रविवारी पहाटे अनेक घरांमध्ये बल्बचे स्फोट होवून टीव्ही, फ्रीज, गिझरसह विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गॅस पाईपलाईन ठेकेदारावर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा अशा घटना घडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे महापालिकेने काही दिवसांपूर्वी खडीकरण केले. आता त्यानंतरही गॅस पाईपलाईन ठेकेदारांकडून ठिकठिकाणी खोदाई केली जात आहे. यामुळे प्रभागातील अनेक भागात सतत विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. शुक्रवारी, शनिवारी प्रियंका पार्क, जगतापनगर, कालिका पार्क भागात खोदाई करण्यात आली. विद्युत केबल खंडीत झाली. विद्युत दाब वाढल्याने रविवारी पहाटे तीन ते पाच वाजेच्या दरम्यान घरांमध्ये अचानक लाईटचे बल्ब, ट्यूब, सीसीटीव्ही स्फोट झाल्याने रहिवाशी भयभीत झाले. विद्युत पुरवठा खंडीत झाला. सोमवारीही हे दुरुस्तीचे काम वीज वितरण कंपनीकडून सुरूच आहे.
पाणी पुरवठ्यातही यामुळे अडथळा निर्माण झाला. अनेक रहिवाशांचे टीव्ही, फ्रीज, फॅन, गिझर, सीसीटीव्ही यासह विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या रस्त्यांचे, तसेच जनतेच्या विद्युत उपकरणांचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हे दखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे.
अशी घटना पुन्हा घडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, डॉ. सुनील चौधरी, राजेंद्र महाले, मुकुंद रनाळकर, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील, वंदना पाटील आदींनी दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, शहर अभियंता नितीन वंजारी यांना सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
लाखो रुपयांचे नुकसान
माझा यापूर्वी तीन लाखांचा टीव्ही नादुरुस्त झाला. काल फ्रीज, गिझर, फॅन, सीसीटीव्हीसह इतर उपकरणे नादुरुस्त झालीत. इतर रहिवाशांचेही नुकसान झाले आहे. महापालिकेने लाखो रुपयांचे नुकसान भरून द्यावे, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
डॉ. सुनील चौधरी, प्रियंका पार्क