नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वेगवेगळया भागात तीन घरफोड्या करुन चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवज लंपास केले. त्यात दोन भरदिवसा झालेल्या घरफोड्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव, इंदिरानगर व उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घरफोडी वडाळा गावात झाली. अमरीन शोएब खान (रा. गल्ली नं. ३, सादिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.४) रात्री ही घरफोडी झाली. खान कुटूंबिय तळमजल्यावरील घरात असतांना अज्ञात चोरट्यांनी टेरेसवर चढून रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे ७ हजार ६९० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
दुसरी घटना जेलरोड भागात घडली. राकेश राजेंद्र माळी (रा.जयकृष्णा अपा.म्हसोबा मंदिर,लोखंडे मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. माळी मंगळवारी (दि.३) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.
तिस-या घटनेत जत्रा हॉटेल ते नांदूर लिंक रोड भागात राहणारे मयुर दिलीप बागुल (रा.प्रांजल सोसायटी जवळ,वृंदावन नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बागुल कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.३०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten