नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवदर्शनाला जाण्यासाठी एस.टी.चे ऑनलाईन तिकीट बुक करणे एका सेवानिवृत्त कर्मचा-यास चांगलेच महागात पडले आहे. ऐनवेळी यात्रा रद्द केल्याने तिकीटाचे पैसे परत मिळविण्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून केलेला संपर्क वृध्दास तब्बल २ लाख ७३ हजार रूपयांना पडला असून भामट्यांनी बोलण्यात गुंतवून वृध्दाच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधर पुरूषोत्तम शानबाग (७४ रा.पाथरवट लेन.पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शानबाग कुटूंबियांनी गेल्या महिन्यात तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवरून तिकीट बुकींग करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी शानबाग कुटुंबियाला यात्रा रद्द करावी लागली. त्यामुळे शानबाग यांनी गुगलच्या माध्यमातून एस.टी.महामंडळाच्या हेल्पलाईनचा शोध घेतला असता ही फसवणूक झाली.
शानबाग यांनी संकेतस्थळावरील नंबरशी संपर्क केला असता भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच शानबाग यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावर भामट्यांनी डल्ला मारला. बँक खात्यातून २ लाख ७३ हजार ०७८ रूपये काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त होताच शानबाग यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.