इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केली. पण, या यादीत सर्वात मोठा धक्का भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना बसला. त्यांचे पुण्याचे पालकमंत्रीपद काढून ते अजित पवार यांना देण्यात आले. त्यामुळे आता चंद्रकांतदादाचे समर्थक आक्रमक झाले आहे. एका समर्थकांनी तर थेट सब याद रखा जायेगा ! भुलेंगे नही ! अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून खळबळ निर्माण केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे, जेव्हा पुण्यामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, पुण्याला वाली नव्हता, तेव्हा कोल्हापूरचा हा ‘वाघ‘ पुण्याच्या मदतीला धावून आला होता..आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय.. असे म्हटले आहे.
खरं तर चंद्रकांतदादा हे सुध्दा प्रचंड नाराज आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास ते एक तास होते. या भेटीबाबत मात्र नंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने त्यासंबधी माहिती देण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले. पण, ही भेट पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेतल्यानंतरची होती. चंद्रकांतदादा यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण, ते समाधानी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यापासून चंद्रकांत पाटील यांचे भाजपमधील राजकीय वजन कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. त्याचाच भाग म्हणून त्यांचे पुणे येथील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले.
खरं तर अजित पवार यांच्याबरोबर त्यांचा वाद नवा नाही. त्यामुळे त्यांनी विरोध करणे समजण्यासारखे आहे. पण, देवेंद्र फडवणीस यांनी चंद्रकांत पाटील यांची साथ दिली नाही. त्यामुळे त्यांना हे पुणे पालकमंत्रीपद गमवावे लागले. चंद्रकांत दादा पाटील हे पुणे येथील कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्हयातील पालकमंत्रीपद हे महत्त्वाचे असतांना त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांचे समर्थक म्हणतात आज गरज सरली तर त्याला दूर तिकडं ‘शेंगा चटणी‘ खायला धाडलं गेलय..अर्थात सोलापूरला….