नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी, भारत दौऱ्यावर आले असून वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्रालयाने काल नवी दिल्ली येथे भारत-सौदी अरेबिया गुंतवणूक मंच २०२३ बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला भारत आणि सौदी अरेबियातील ५०० हून अधिक कंपन्यांची उपस्थिती होती. भारत आणि सौदी अरेबियामधील अशा प्रकारची ही पहिलीच औपचारिक गुंतवणूक बैठक होती. यापूर्वी, सौदीच्या युवराजांनी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सुमारे १०० अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याबाबत केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
भारत-सौदी गुंतवणूक मंच २०२३ च्या मंत्रिस्तरीय सत्राचे सह-अध्यक्षपद केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि सौदी अरेबियाचे गुंतवणूक मंत्री खालिद ए. अल फलिह यांनी भूषवले. व्यावसायिक मेळाव्याला संयुक्तपणे संबोधित करताना, दोन्ही मंत्र्यांनी स्टार्ट-अप, डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, दोन्ही देशांमधल्या गुंतवणूक प्रोत्साहन संस्थांच्या माध्यमातून आणि गुंतवणूक प्रोत्साहन कार्यालयांच्या स्थापनेच्या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यवसाय आणि गुंतवणूकदार परिसंस्थांमधील सहकार्य वाढवणे, निधींच्या माध्यमातून सध्याच्या गुंतवणूक ओघाव्यतिरिक्त भारतात थेट गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी सौदी सार्वभौम संपत्ती निधीला चालना आणि संयुक्त प्रकल्पांची संभाव्यता, यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्याचे मार्ग आणि माध्यमांवर चर्चा केली.
अन्न प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, ऊर्जा विशेषतः नवीकरणीय ऊर्जा, कौशल्य विकास, अंतराळ, माहिती व संवाद तंत्रज्ञान, स्टार्ट अप्स विशेषत: डिजिटल डोमेनमधील स्टार्ट-अप, या क्षेत्रांमध्ये संभाव्य गुंतवणूक सहकार्यांची रूपरेषा दोन्ही मंत्र्यांकडून मांडण्यात आली.
तत्पूर्वी, G2B (सरकार आणि उद्योग) आणि B2B (दोन्ही देशाच्या उद्योगांमध्ये) स्वरूपात दोन्ही बाजूंनी ४५ हून अधिक सामंजस्य करार झाले. या सामंजस्य करारांमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल. तसेच यामुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूक प्रवाहाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
The decision taken at the India-Saudi Arabia Investment Forum meeting will be beneficial