इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसवर खरा हक्क कुणाचा यावरून वाद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेचा उधाण आले आहे. अंतिम शब्द कुणाचा या प्रश्नावर वळसे पाटील यांनी शरद पवार यांचाच असे सांगितल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेबाबत वळसे पाटील म्हणाले, की साहेबांची भेट घेतल्यामुळे कोणताही संभ्रम होण्याचे कारण नाही. शरद पवार विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या संस्थांच्या कामासाठी भेटावे लागते. रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांची मी घेतलेली भेट ही पूर्वनियोजीत होती.
रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ या संस्थामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत आलो. यापुढेही त्यांचे मार्गदर्शन घेणार आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.