इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ३ दावेदार रांगेत उभे असताना न्युझीलंडने मात्र श्रीलंकेला पराभूत करुन आज त्यांना मिळालेल्या पहिल्याच संधीचे सोने केले. त्यांनी केवळ विजयाचे २ गुण हस्तगत केले नाहीत तर आधीच चांगला असलेला रनरेट आणखी ‘धष्टपुष्ट’ करून ठेवला. बंगलोर मध्ये झालेल्या आजच्या या सामन्यात फक्त श्रीलंकेचा पराभव झाला नाही तर त्याचबरोबर या सामन्याकडे डोळे लावून बसलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांची शिकार देखील न्यूझीलंडने करुन टाकली.
या सामन्यानंतर न्युझीलंडचा रनरेट आता इतका तगडा झाला आहे की तो आकडा गाठण्यासाठी पाकिस्तानला परवा इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात इंग्लंडला तब्बल २८७ धावांनी पराभूत करावे लागेल. पाकिस्तानचा फॉर्म बघता या संघाला स्वतःच्या डावात २८७ धावा उभ्या करणे देखील अशक्यप्राय असतांना इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवणे अवघड आहे. सामान्य क्रिकेटच्या भाषेत ही एक अशक्य बाब असल्यामुळे अजूनही पाकिस्तानला सेमी फायनलचे स्वप्न जर पडत असेल तर त्यांना मैदानात खेळाडू नव्हे तर यंत्रमानव उतरवावे लागतील हे निश्चित. अफगाणिस्तान संघाचा रनरेट हा तर पाकिस्तान पेक्षा देखील कमी असल्यामुळे पाकिस्तान बरोबरच अफगाणिस्तानच्या खेळाडूंना देखील आता मायदेशी परतण्यासाठी स्वतःचे ‘लगेज’ बांधायला सुरुवात करावी लागेल.
काल ‘इंडिया दर्पण’ने विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये पोहोचणारा ४ नंबरचा संघ कोणता असेल याचे विश्लेषण प्रसिद्ध केले होते. न्यूझीलंड फक्त श्रीलंकेविरुद्धची मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करणार नाही तर तिथे स्वतःचा रनरेट देखील मजबूत करण्यावर न्यूझीलंडचे लक्ष राहील असे या विश्लेषणात नमूद करण्यात आले होते. ते आजच्या सामन्यात तंतोतंत खरे ठरले.
आज न्यूझीलंडने श्रीलंकेचा २३.२ षटकातच ५ गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला या सामन्यातही चमक दाखवताच आली नाही आणि ४६.४ षटकात अवघ्या १७१ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. कुसल परेराचे अर्धशतक एवढेच श्रीलंकेच्या डावातील ठळक वैशिष्ट्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या किवीजच्या सलामी वीरांनी नेहमीप्रमाणे संघाला मजबूत सलामी उपलब्ध करून दिली. डेवन कॉन्वे (४५) आणि रचीन रवींद्र (४२) यांनी संघ सुस्थितीत आणून ठेवल्यानंतर या दोघांच्या विकेटस् श्रीलंकेला मिळाल्या. मधल्या फळीत न्यूझीलंडची थोडीफार पडझड झाली खरी. परंतु, अतिशय कमी धावांचे आव्हान समोर असल्याने न्यूझीलंडला या विजयासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
आजच्या या सामन्यानंतर येत्या १५ तारखेला होणाऱ्या विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार हे पक्के झाले आहे, त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही इतकेच.