विजय वाघमारे, जळगाव
जळगाव – संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी कोठडीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली होती. या कैद्यांना जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळून अहमदनगर एलसीबीच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. या वृत्ताला जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे.
जामनेर जवळील शेळगावमधील शेतातून केली अटक ; मदत करणारेही ताब्यात !
बलात्कार, खून सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली होती. यातील एका पथकाला फरार कैद्यांची कार जामनेर जवळ खराब झाल्याचे कळाले. यानंतर पथकाने तपासचक्र फिरवीत जामनेरच्या दिशेने प्रवास सुरु केला. पोलिसांना कळाले की, जामनेर जवळील शेळगाव शिवारात एका शेतात लपून बसले असल्याचे कळाले. शेळगाव मधील राजपूत नामक व्यक्तीच्या शेतात चौघं कैदी लपून बसले होते. अहमदनगर पोलिसांचे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास शेळगावमध्ये पोहचले आणि शेताला चौरही बाजूने घेरले. कैद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू शिताफीने त्यांना नगर एलसीबीने ताब्यात घेतले. यावेळी जामनेर पोलिसांनी अहमदनगर एलसीबीच्या पथकाला योग्य ती मदत केली. जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी वृत्ताला दुजोरा देतांना सांगितले की, आज दुपारी नगर पोलिसांच्या पथकाने फरार कैद्यांना अटक केली. स्थानिक पोलिसांना त्यांना सहकार्य केले. तर फरार चारही कैद्यांना मदत करणारे मोहनलाल ताजी भाटी (वडगाव शेरी), अल्ताफ असिफ शेख (पुणे) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा वृत्ताला जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
गज कापून केले होते पलायन !
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. बुधवारी पहाटे या कारागृहातील नंबरच्या कोठडीचे गज कापून आरोपींनी पलायन केले होते. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.
चौघांवर गंभीर गुन्हे !
पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे समोर आले होते. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले होते.
हत्यार कसे उपलब्ध झाले?
कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तरीही हत्यार कसे उपलब्ध झाले?,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती.