नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्ष स्थापन करुन त्याद्वारे विविध यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
नाशिक कुंभमेळा-२०२७-२८ पूर्वतयारी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, नाशिक मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापक डॉ. आवेश पलोड उपस्थित होते.
कुंभमेळ्यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यात यावे. तसेच यावेळी वाहतुक, पार्कींग व्यवस्था, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, दूरसंचार व्यवस्था, कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची चर्चा या बैठकीत करण्यात आली. विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, मागील कुंभमेळ्यात ज्या अडचणी आल्या त्या अडचणी आगामी कुंभ मेळ्यात येवू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात.