इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अचानक हवामान बदल झाला आहे. अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली होती. राज्यात अनेक भागांत पाऊस झाला. आजही पाऊस होणार आहे. देशात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पाऊस होणार आहे. तेलंगणा, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अलिबाग, पेण तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. द्राक्ष आणि कांद्याला या पावसाचा फटका बसणार आहे; परंतु अन्य रब्बी पिकाला पावसाचा फायदा होणार आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम संकटात आहे. पुन्हा अवकळी पाऊस सुरू झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतमाल घरात आणण्याची शेतकऱ्यांची घाई सुरू असताना अवकाळी पाऊस सुरू झाला आहे.