नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आणि मित्र विहार संस्था, यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजीत ३ ऱ्या राज्यस्तरिय चॅम्पियन लीग स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. या स्पर्धेत शिवनेरी किंग संघाने आपला दबदबा कायम राखत अंतीम लढतीत तोरणा टायगर्सचा ४ विरुद्ध १ असा पराभव करून या लीगचे विजेतेपद पटकावले. या अंतीम सामन्यात पहिल्या दोन लढतीत चांगलीच चुरस दिसून आली.
पहिल्या सामन्यात तोरणा टायगर्सच्या सई जगतापने शिवनेरी किंग्सच्या प्रणालीला पराभूत करून विजय प्राप्त केला आणि १-० अशी आघाडी मिळविली. मात्र दुसऱ्या सामन्यात शिवनेरीच्या ओम पाटीलने जोमाने सुरवात करून तोरणा टीजर्सच्या पार्थ नागरेला पराभूत करून आपल्या संघाला १ – १अशी बरोबरी मिळवून दिली. या विजयामुळे उत्साहित झालेल्या रायगड किंगच्या खेळाडूंनी पुढील तीन लढतीत सुंदर खेळ करून विजय प्राप्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शिवनेरोच्या वैशाली पाटील, सनी रानमाळे शुभांगी राऊत यांनी सुंदर खेळ करून विजय संपादन करत आपल्या संघाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. या कामगिरीमुळे शिवनेरी किंगने या स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले. या स्पर्धेत अंकाई अटॅकर्सने तीसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकचे आमदार आणि माझी राष्ट्रीय ज्यूदो खेळाडू राहुल ढिकले, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटिल, ज्येष्ठ ज्युदो संघटक डॉ.रत्नाकर पटवर्धन, मा. प्राचार्य कैलास पाटील, प्रशिक्षक विजय पाटिल, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अतुल शेलार, प्रसाद मोकाशी, तुषार माळोदे यांच्या हस्ते पार पडला. विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम आणि आकर्षक चषक आणि मेडल्स प्रदान करून सन्मानित कऱण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले की नाशिकच्या ज्युदो प्रशिक्षक आणि संघटक यांनी या वैयक्तिक खेळाला सांघिक स्वरूप देवून चांगले पाऊल उचलले आहे. खेळाडूंना याचा फायदा होईल आणि त्यांना चांगली प्रगती करता येईल. त्यामुळे हा उपक्रम राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे सांगितले. या स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पुणेचे संदीप कोंडे आणि त्यांचे सहकारी यांनी यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, राज्य ज्युदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेतकर, तुषार माळोदे, माधव भट, सुहास मैंद, वाघचौरे आणि सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
१) शिवनेरी किंग – विजेता.२) तोरणा टायगर्स – उपविजयी. ३) अंकाई अटॅकर्स – तीसरा क्रमांक.