इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी आज बीड जिल्ह्यात आ.प्रकाश सोलंकी,जयदत्त क्षिरसागर, आ.संदिप क्षिरसागर, माजी आमदार अमरसिंग पंडित, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड सुभाष राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल ‘रामा इंटरनॅशनल’ छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकारांशी ते संवाद साधणार आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या संपर्क कार्यालयात तोडफोड करत संपूर्ण घर व कार्यालय पेटवून देण्यात आले होते. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी व कार्यालयाची पाहणी केली. तसेच क्षीरसागर कुटुंबीयांची भेट घेतली.
बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) कार्यालय पेटविण्यात आले होते. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यालयाची पाहणी केली.
११ कोटी रुपयांचे नुकसान
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्हयात हिंसक वळण लागले होते. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर व अन्य नेत्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या. माजलगाव नगरपालिकेचे कार्यालय जाळण्यात आले. बीड शहरातील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसची तोडफोड करण्यात आली. या सर्वच घटनेत सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पोलिसांनी १४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व घटनेनंतर येथील तणाव आता निवळला आहे.