नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हैद्राबाद येथे घर घेण्यासाठी माहेरून दोन कोटी रूपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीने विवाहीतेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. सासू व पतीने मारहाण करीत स्त्रीधन काढून घेत महिलेस घराबाहेर काढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी १४ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने सिडको भागात वास्तव्यास असलेल्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे.
विदेशात राहणा-या पतीसमवेत पाठविण्याचे आमिष दाखवत हा विवाह पार पडला होता. सासरी नांदत असतांना हैद्राबाद येथे घर घेण्यासाठी माहेरून दोन कोटी रूपये व सोन्याचांदीचे दागिणे आणावेत या मागणीसाठी पीडितेचा छळ करण्यात आला. महिलेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने सासूसह पतीने तिला मारहाण करण्यात आली. तसेच स्त्रीधन बळजबरीने काढून घेत तिला घराबाहेर काढल्याने विवाहीतेने माहेर गाठत पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.