मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेष्ठ मराठी अभिनेता विजय कदम यांचे आज पहाटे निधन झाले. अंधेरीच्या राहत्या घरी त्यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत होते. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाचच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजय कदम यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही रे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे. त्यांनी विनोदी भूमिकांप्रमाणे गंभीर भूमिकाही केल्या.
त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य तुफान गाजले, रंगभूमी सिनेमांमध्ये काम करत असताना विजय कदम यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलिसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले.