नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरात प्रवेश न दिल्याने संतप्त दीराने भावजयीचे घर पेटवून दिल्याची घटना सेवाकुंज मार्गावरील मजूर वाडीत घडली. परिसरातील नागरीकांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत महिलेच्या जिवीतास धोका निर्माण करून आर्थीक नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित दिराविरोधात अपक्रियेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत बाळासाहेब जगताप (रा.खांडगावखडी,नांदूरमधमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दिराचे नाव आहे. याबाबत मजूरवाडीतील पाण्याची टाकी भागात राहणा-या ३९ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. संशयित हा पीडितेचा दिर असून गुरूवारी (दि.८) रात्री तो महिलेच्या घरी आला होता. यावेळी महिलेने त्यास आपल्या घरी येण्यास मज्जाव केल्याने ही घटना घडली. महिलेस शिवीगाळ करीत तुला बघून घेतो अशी धमकी देवून घराबाहेर पडला होता.
पहाटेच्या सुमार महिला आपल्या घरात झोपलेली असतांना संशयिताने बंद घराच्या लाकडी दरवाजावर पेट्रोलसारखा ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा अंदाज आहे. हा प्रकार पहाटे साफसफाई करणा-या महिलांच्या निदर्शनास आल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत महिलेच्या जीवीतास धोका निर्माण करून तिचे आर्थीक नुकसान करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.