नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– डी मार्ट मॉल मध्ये खरेदी करीत असतांना डॉक्टर महिलेची ट्रॉलीमध्ये ठेवलेली पर्स लांबविणा-या भामट्यास पोलीसानी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. फोन पे च्या माध्यमातून मॉलचे बिल पेड केल्याने संशयित पोलीसांच्या हाती लागला असून त्याच्या ताब्यातून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहेत. त्यात सात हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. ही कारवाई मुंबई नाका पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदिप रामचंद्र बर्वे (३८ रा.पंचधारा अपा.दत्तमंदिररोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत डॉ. मृणाल शैलेश काळे (रा.अशोका टॉवर्स समोर,अशोकामार्ग) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. काळे या मंगळवारी (दि.६) दुपारी घरगुती सामान खरेदीसाठी साईनाथ नगर येथील डी मार्ट शॉपींग मॉल मध्ये गेल्या होत्या. लोखंडी ट्रॉलीत पर्स ठेवून त्या साहित्य काढत असतांना अज्ञात भामट्यांनी त्यांची पर्स लांबविली होती. या पर्स मध्ये सात हजाराच्या रोकडसह पेंडल असलेली सोन्याची पोत व बांगड्या असा सुमारे १ लाख २२ हजाराचा ऐवज होता. ही बाब निदर्शनास येताच मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने मुंबईनाका पोलीसांनी घटनास्थळ गाठून सीसीटिव्ही यंत्रणेची पाहणी केली. या पाहणीत चोरट्याने फोन पे द्वारे खरेदीचे बिल पेड केल्याची बाब समोर आल्याने त्याच्या शोध घेवून मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्याकडून पर्समधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील,उपनिरीक्षक एन.एस.शेख,हवालदार आर.आर.टेमगर,अंमलदार सागर जाधव,राजेद्र नाकोडे,अमोल बागलाने,कविता महाले आदींच्या पथकाने केली.