नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉईंटला मंजुरी मिळाली आहे. लवकरच नगरसुल रेल्वे स्थानकात गुड्स शेडची उभारणी होऊन या ठिकाणी खतांचे रेक उतरवता येणार आहे. या रेक पॉईंटमुळे देशभरात शेतमालासह अन्य वस्तूंची मालवाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉइंट विकसित करण्यात यावा याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली होती. तसेच याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉइंटला मंजुरी मिळाली आहे.
कुंभमेळ्याच्या काळामध्ये नाशिक सहनजीकच्या रेल्वे स्थानकातील कव्हर गुड्स शेडचा वापर हा भाविकांच्या निवासासाठी करण्यात येतो. या कालावधीत सर्व गुड्स शेड्स हे भाविकांसाठी राखीव करण्यात येतात. नाशिकसह परिसरातील १०० किलोमिटर अंतरावरील स्थानकातील शेड्स राखीव असतात. त्यामुळे नगरसुल रेल्वेस्थानकात रेक पॉईंट विकसित करण्यात यावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉईंट विकसित करण्यात मंजुरी मिळाली आहे.
रेक पॉइंटला मंजुरी मिळाल्याने लवकरच नगरसुल रेल्वे स्थानकात कव्हर गुड्स शेड विकसित करण्यात येऊन याठिकाणी खताचे रेक सुरू होतील. तसेच या रेक पॉइंटमुळे शेतमालासह इतर मालवाहतूक करण्यास फायदा होणार आहे.