नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ट्रव्हल्स व्यवसायात भागीदारीत केलेली वाहन खरेदीत महिलेला एकाने तीन लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने परस्पर वाहन विक्री करून महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित राजाराम हडकर (३८ रा.प्रथम अपा.राणेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत स्वाती सोनगीरे (रा.सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार महिलेचा टुर्स अॅण्ड ट्रव्हल्सचा व्यवसाय असून सन.२०१७ मध्ये त्यांनी भागीदारीत एमएच १५ एफव्ही ४१४० हे तवेरा वाहन खरेदी केले होते. ठरल्याप्रमाणे प्रत्येकी ९५६५ असा १९ हजार १३१ रूपयांचा वाहनकर्जाचा हप्ता भरण्यात आला. एप्रिल २०२२ मध्ये दोघांनी संपुर्ण कर्जाची परतफेड केली. त्यानंतर संशयित हडकर याने १ लाख ८५ हजाराचा व्यवसाय करूनही महिलेस एक रूपया दिला नाही.
तसेच भागीदारीतील सदर वाहन संशयिताने परस्पर ४ लाख २५ हजार रूपयांना दुस-यास विक्री केले या व्यवहारात महिलेने भरलेले हप्ते आणि व्यावसायीक उत्पनातून मिळालेली रक्कम अशी ३ लाख ५ हजार रूपयांची महिलेची फसवणुक करण्यात आली असून महिलेने पैश्यांची मागणी केली असता संशयिताने तुला मारून टाकतो अशी धमकी दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.