नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक मधील अंबड,सातपूर सिन्नरसह महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक क्षेत्रामधील ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल ना नफा ना तोटा तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनला चालविण्यास देण्यात यावे अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.
नाशिक पश्चीमच्या आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात नाशिक शहरातील अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत आज बैठक पार पडली. यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वाहतूकदारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले.
यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी,सचिव शंकर धनावाडे, सल्लागार रामभाऊ सूर्यवंशी, कोषाध्यक्ष बजरंग शर्मा, उपाध्यक्ष दलजीतसिंग मेहता सल्लागार भगवान कटीरा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,बाळासाहेब झंजे, अवर सचिव किरण जाधव, अधीक्षक अभियंता पवार, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक ही नोंदणीकृत संस्था असून चालक आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असते. ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा मुख्य कणा हा चालक असून, सद्यस्थितीत चालकांचे प्रमाण घटत चालले आहे. आजमितीला संपूर्ण देशात २५ टक्के वाहने ही चालकांअभावी उभी असतात, चालकांचे प्रमाण घटत जाणे हे भविष्यात एक संकट बनून उभ राहू शकते ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती असे लक्षात येत आहे की वर्तमान स्थितीत चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यातील प्रमुख समस्या म्हणजे चालकांना पुरेशी झोप नाही. कारण त्यांच्यासाठी तशा सुविधाच उपलब्ध नाही. चालक विश्रांती साठी जरी धाबे उपलब्ध असले तरीही गाडीतील माल चोरी जाण्याच्या भीतीने, डिझेल चोरी जाण्याच्या भीतीने किंवा समाज कंटकांकडून गाडीचे नुकसान होण्याच्या भीतीने चालक झोपतच नाही. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो, पुरेशी झोप नसल्याने तो कुठल्यातरी नशेचा सहारा घेतो व कालांतराने त्या नशेच्या विळख्यात सापडतो. परिणामी अपघाताचे प्रमाण देखील अधिक वाढत असल्याचे म्हटले आहे.
चालकांसाठी त्यांची गाडी सुरक्षित पार्क होईल व त्यांना पुरेशी झोप घेता येईल,दैनंदिन स्वच्छता,चांगल जेवण, आरोग्य तपासणी,व्यसन मुक्ती,वाहतूक नियमांचे व नवीन वाहनांचे सिस्टम समजावणे साठी ट्रेनिंग, पेट्रोल पंप,गॅरेज अशा प्रकारच्या विश्रांती गृहांची नितांत गरज आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने वाहन चालकांसाठी सर्व सोईयुक्त असा “सारथी सुविधा पार्क” बनविण्याचे ठरविले असून सदर सारथी सुविधा पार्कमध्ये वाहनांसाठी सीसीटीव्ही अंतर्गत सुरक्षित पार्किंग, पेट्रोल पंप,गॅरेज,सुसज्ज डोरमेटरी, स्वच्छ स्वच्छतागृहे, स्वयंपाकासाठी सामुदायिक किचन, छोटेखानी वाचनालय, जिम, प्लेईंग एरिया, एंटरटेनमेंट झोन, वेगवेगळ्या वर्कशॉप साठी हॉल, हेल्थ चेकअप सेंटर,जॉगिंग ट्रॅक, वाजवी दरात शुद्ध आणि सात्विक जेवण भेटेल असे हॉटेल,हे सर्व समाविष्ट असणार आहे.
पार्किंग स्लॉट बनविताना रात्री वाहनांसाठी पार्किंग व दिवसा वाहन शिकण्यासाठी ट्रॅक या पद्धतीची रचना असेल. रात्री पार्क झालेली वाहने दिवसा गेल्यानंतर तेथील ट्रॅकवर आजूबाजूच्या परिसरातील, गावातील नाशिकचा विचार करता आदिवासी भागातील युवकांना वाहन चालविण्याचे मोफत ट्रेनिंग देण्यात येईल, परवाना काढून देण्यात येईल व जास्तीत जास्त रोजगार वाढविण्याचाही संस्थेचा मानस आहे.
सद्या नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आहे. या ट्रक टर्मिनलची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. महापालिका आता सकारात्मक काही सुविधा येथे करन्यास तयार आहे . नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा मानस आहे सामाजिक दायीत्वातून आडगाव येथील ट्रक टर्मिनल विकसित करू इच्छिते व येथे सर्व सोईनी सुसज्ज असे “सारथी सुविधा पार्क” उभे करू इच्छिते. सोबतच नाशिक शहरात चारही बाजूला प्रवेशद्वारा जवळ जकात वसुली नाके होते आता ते बंद असून त्या जागेवर सुधा ट्रक टर्मिनल होऊ शकते व महापालिकेला उत्पन्न मिळू शकते शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते.
“सारथी सुविधा पार्क” बाबतच्या प्रचारासाठी संस्थेने उद्योजकांच्या मदतीने नाशिक शहरात मे २०२३ मध्ये भव्य असा ऑटो व लॉजिस्टिक एक्स्पो भरविला होता. या एक्स्पो च्या माध्यमातून उद्योगाला चालना देण्यासोबत, चालकांच्या हितासाठी आणि वाहतुकीच्या सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने ट्रक टर्मिनल मध्ये सुविधा देण्याचा संस्थेचा मानस होता.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागणीचा सकारात्मक विचार करून नाशिक सह राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी आपण मदत करावी तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल ना नफा ना तोटा तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनला चालविण्यास देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.