गौतम संचेती, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळाली विधानसभा मतदार संघार आमदार सरोज आहिरे यांना माजी आमदार योगेश घोलप, सेवानिवृत्त तहसीलदार डॉ.राजश्री अहिरराव नाही तर या निवडणुकीत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा व भाजपाच्या पदाधिकारी प्रीतम आढाव या चुरशीची टक्कर देणार आहे. त्यांनी आता लढायचं व जिंकायचं असाच नारा दिल्यामुळे त्या या निवडणुकीत उमेदवारी करणार हे आता निश्चित झाले आहे.
गेल्यावेळी सुध्दा त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी यावेळी निवडणुक लढवायची असा निश्चिय केल्यामुळे त्या जोरात कामाला लागल्या आहे. देवळाली मतदार संघात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हा सर्वात मोठा भाग असून येथील एकतर्फी मते घेऊन विजयांचे गणित त्यांनी आखले आहे. वडील कै. दिनकर आढावा सहा वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले. तर पाच टर्म ते उपाध्यक्ष राहिले. त्यांच्या राजकीय कारकिर्दिचा त्यांना मोठा फायदा होणार आहे. सर्व जाती धर्मातील लोकांशी असलेले संबध या निवडणुकीत त्यांना उपयोगी पडणार आहे.
भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या प्रीतम आढाव यांनी होम मिनिस्टर, मंगळागौर, हळदी कुकुं समारंभ यासारखे विविध कार्यक्रम भव्य स्वरुपात घेतले. त्याचबरोबर त्यांनी घेतलेले मेळावे सुध्दा लक्षवेधी ठरले. वाढदिवसानिमित्त जेवणावळी व स्नेहमिलन चर्चेत राहिले. त्याचप्रमाणे त्यांनी ३८ जिल्हा परिषदेच्या शाळांना दिलेले डिजीटल स्क्रीन दिले. सतत मतदारांच्या संपर्कात त्या राहतात व विविध उपक्रमांना देणगी व कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा आहे.
अनुसूचित जातीसाठी १९७८ पासून राखीव झालेल्या देवळाली मतदार संघाने सातत्याने काँग्रेस विरोधी विचारसरणीचा आमदार विजयी केले होते. लागोपाठ सहा पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा या मतदार संघात फडकला आहे. पण, गेल्या वेळेस शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत जॉईंट किलर ठरलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या विजयी झाल्या. पण, पाच वर्षात त्या फारशा प्रभावी ठरल्या नाही. २०१९ मध्ये आपले वडील माजी आमदार कै.बाबूलाल अहिरे यांची पुण्याईने तर ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांना विजय मिळाला. त्यांनी काही विकास कामेही केली. पण, त्यांना यावेळेसची ही निवडणूक इतकी सोपी नाही.
दुसरीकडे शिवसेना दुभंगल्यानंतर येथील राजकारणही बदलले आहे. या ठिकाणी पाच वेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप आता शिंदे गटात आहे. त्यांचे पुत्र योगेश घोलप हे ठाकरे गटात आहे. तर बहिण तनुजा घोलप या भाजपमध्ये आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील सर्व जण आता वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे मतदारांचा संभ्रम आहे. त्यात घोलपांचे वर्चस्व या मतदार संघात आता कमी झाले आहे.
सेवानिवृत्त झालेल्या तहसीलदार डॉ.राजश्री अहिरराव पण आता आपण केलेल्या प्रशासकीय व सामाजिक कार्याच्या जोरावर व मतदार संघात भेटीगाठी घेण्यासाठी सर्वाधिक चकरा मारत आहे. पण, त्यांच्या कामाची सर्व स्टाइल ही शासकीय कामासारखी असून राजकीय पटालावर त्या कितपत य़शस्वी होतात हे अद्याप निश्चित नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते लक्ष्मण मंडाले यांची देखील ‘चाय पे चर्चा’ करण्यासाठी वेळोवेळी मतदारांची चाचपणी करत आहे. त्यांचाही मतदार संघात भेटीगाठी घेण्याकडे कल वाढला आहे. या प्रमुख उमेदवारांनंतरही अनेक जण इच्छुक असले तरी या सर्वात आता प्रितम आढाव याची उमेदवारी प्रमुख उमेदवारांना चुरशीची टक्कर देणार अशी चर्चा आहे. त्यामागचे गणित जर समजून घेतले तर त्या सर्वात प्रभावी ठरणार आहे.