नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात कार अडवून बापलेकास मारहाण करीत दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्यार व दगडाचा वापर करण्यात आल्याने कारमधील दोघे जखमी झाले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेत भामट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम व्यकंडी माडे (२७ रा.मुकूंदवाडी, छत्रपत्री संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम मांडे व त्यांचे वडिल पालघर येथे गेले होते. गुरूवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास बापलेक त्र्यंबकरोडने एमएच २० एफडी ५५१२ या स्विफ्ट कारमधून परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पपया नर्सरी भागात काळया रंगाच्या अॅक्टीव्हावर आलेल्या दोघांनी कार अडवून माडे बापलेकास शिवीगाळ केली. यावेळी खिडकीतून काही तरी हत्याराने व दगडाने बापलेकास मारहाण करण्यात आली.
या घटनेत जखमी बापलेकाच्या खिशातील सुमारे २४ हजार ५०० रूपयांची रोकड व महत्वाची कागदपत्र बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून जातांना कारला दगड मारण्यात आल्याने काच फुटून नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक न्याहळदे करीत आहेत.