इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तब्बल २५ महिलांची लग्न करणारा फिरोज नियाज शेख (४३) ला पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. महिलांशी लग्न करुन त्यांची लुट करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी ३ लाख २१ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. त्याचप्रमाणे अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, ६ मोबाईल, १ लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
२०१५ मध्ये फिरोज शेखने पुण्यातील चार महिलांशी लग्न केले. त्यानंतर तो २०२३ मध्ये तो ६ वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
असा सापडला जाळ्यात
अनेक महिलांना फसवणारा फिरोज नियाज शेखने एका लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेऊन तो पसार झाला. त्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले.
अशी करायचा फसवणूक
पोलिस तपासात फिरोजने २५ घटस्फोटित आणि विधवा महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना हेरत असे. त्यांच्याशी ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा. जमले तर लग्न करून मोकळा व्हायचा. त्या महिलेचे सर्व सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा. हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती.