नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय डाक सेवा तथा पोस्ट खात्यात लाखोंचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबड व सिडको शाखेत ९ लाख ३६ हजार ७८० रूपयांचा अपहार करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एका कर्मचा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन विठोबा बोरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कर्मचा-याचे नाव आहे. याबाबत उपनिभागीय डाकघरचे सहाय्यक अधिक्षक गोपाल सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
बोरकर सन.२०१६ ते सन. २०२२ या काळात अंबड आणि सिडको कार्यालयात डाक सहाय्यक पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी ९ लाख ३६ हजार ७८० रूपयांचा अपहार करून भारतीय डाक विभागाची फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.