इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः गुजरात प्रशासनाने तडीपार केलेल्या आणि आता केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांनी मला भ्रष्टाचारी म्हणावे, हे हास्यास्पद आहे. अशा व्यक्तीच्या हाती देशाचे गृहखाते आहे. मोदी- शाह यांना वेळीच रोखले नाही, तर देशाचे शंभर टक्के वाटोळे होईल,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी शाह यांना प्रत्त्युत्तर दिले.
प्राचार्य डॉ. मगदुम फारुकी यांच्या ‘पद्मभूषण शरद पवार एक अजीम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, की मी मुख्यमंत्री असताना जबाबदारीने काम केले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्या वेळी महंमद अली रोडवरही स्फोट घडल्याचे आपण सांगितले होते. तत्कालिन परिस्थितीत सामाजिक शांतता राहावी, म्हणून मी हे खोटे बोललो होतो. ज्यांनी भारताचे संविधान लिहिले, त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला दिले, तर इथे जाळपोळ घडवून आणली. मी काय वाईट केले होते? अशी कटकारस्थाने सुरूच राहणार असून त्याला तोंड देत व शांतता अबाधित ठेवण्यात समाजहित आहे.