नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, आपत्ती जोखीम कमी करण्याच्या (डीडीआर) क्षेत्रात भारत जागतिक आणि प्रादेशिक नेतृत्वाची भूमिका बजावत आहे. भारताने त्यासाठी जागतिक पातळीवर अनेकवेळा पुढाकार घेतला आहे. आपत्ती रोधक पायाभूत सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय युती (सीडीआरआय) हे त्याचेच उदाहरण आहे.
केंद्र सरकारचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) विभागप्रमुख आणि सदस्य म्हणून राजेंद्र सिंह यांनी 2024-25 या वर्षासाठी चीनकडून आशियाई आपत्ती सज्जता केंद्राचे (एडीपीसी) अध्यक्षपद गुरुवार, 25 जुलै 2024 रोजी थायलंडमध्ये बँकॉक येथे स्वीकारले. एडीपीसी ही आशिया आणि प्रशांत प्रदेशात आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आणि हवामान बदलाचा प्रतिकार करण्यासाठी सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारत तसेच बांगलादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलीपिन्स, श्रीलंका आणि थायलंड हे आठ शेजारी देश या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.
काल याच ठिकाणी एडीपीसीच्या विश्वस्त मंडळाची पाचवी बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली झाली.