इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांना मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाने नागरिकांना आर्थिक मदतीबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शुक्रवारी त्यांनी पुण्यातील विठ्ठल नगर, एकता नगर, चरवड नगर राधाकृष्ण विहार परिसर, निंबज नगर, वारजे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे , उत्तमनगर शिवणे परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी खा.सुळे यांनी बधितांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. अतिवृष्टीबरोबरच स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या असमन्वयामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, संसारुपयोगी साहित्यांचे नुकसानीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
त्यामुळे शासनाने नागरिकांना आर्थिक मदतीबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनीही पुढे येऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.